जेव्हा भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार सौरव गांगुलीने २००२ साली लॉर्ड्सवरील इंग्लण्ड विरुद्धच्या नेटवेस्ट मालिकेच्या विजयानंतर एण्ड्रयु फ्लिन्टॉपला चिथवण्यासाठी सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि वीवीएस लक्ष्मणला शर्ट काढण्यास सांगितले होते. तेव्हा या तिघांनी त्यास नकार दिला होता. या तिरंगी मालिकेदरम्यान भारतीय संघाचे व्यवस्थापक असलेले राजीव शुक्ला यांनी हा खुलासा केला. त्यावेळी शुक्ला लॉर्ड्सवर गांगुलीच्या शेजारी बसले होते. न्यूज २४च्या ‘क्रिकेट कॉन्क्लेव्ह’ दरम्यान त्यांनी हा खुलासा केला. त्यावेळच्या आठवणी ताज्या करताना ते म्हणाले, मला आठवतंय एण्ड्रयु फ्लिन्टॉपला त्याच्याच शैलीत उत्तर देण्याची सौरवची इच्छा होती, जेव्हा त्याने प्रेक्षकांसमोर आपला जर्सी काढून हवेत फिलवला. खर तर संघातील सर्वांनी आपापला जर्सी काढून हवेत फिरवावा, अशी सौरवची इच्छा होती. परंतु, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि वीवीएस लक्ष्मणसह सर्वांनी नम्रपणे सौरवच्या या प्रस्तावाला नकार दिल्याचेदेखील त्यांनी सांगितले.
१३ जुलै २००२ साली लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या त्या सामन्यात भारताने इंग्लंडचे ३२६ धावांचे आव्हान यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर सौरव गांगुलीने अंगावरील जर्सी काढून आनंद साजरा केला होता. अनेकांना सौरवचे हे वागणे रुचले नव्हते.
क्रिकेट आता शिष्टजनांचा खेळ राहिला आहे की नाही, या विषयावरील चर्चेदरम्यान ही आठवण सांगताना ते म्हणाले, क्रिकेटपटूंच्या व्यवहारात होत असलेल्या बदलाने घाबरण्याचे कारण नाही. ज्याप्रमाणे भारतात खूनाबाबतचा कायदा असूनदेखील खून होणे थांबलेले नाही, त्याचप्रमाणे कायदे करूनदेखील क्रिकेटपटूंच्या वागण्यावर अंकुश ठेवता येणार नाही. अशारितीनेच क्रिकेट पुढे जाणार असून, त्यात घाबरण्यासारखे काही नाही.
मैदानावरील आपल्या वागण्याने देशाची मान शरमेने खाली जाणार नाही, याचा क्रीडापटूंनी विचार करावा, असा सल्ला माजी क्रिकेटपटू अरुणलाला यांनी दिला. ते म्हणाले, जेव्हा मैदानावर एखादा खेळाडू विक्षिप्तपणे वागतो, तेव्हा मला भयंकर चीड येते. क्रिकेटपटूंना हे कळायला हवे की यामुळे केवळ त्यांचेच नव्हे, तर देशाचे नावदेखील खराब होते.
आयपीएलमधील सट्टेबाजी आणि स्पॉट फिक्सिंगचा तपास करत असलेले निवृत्त न्यायमूर्ती मुकुल मुदगलदेखील या चर्चेत सहभागी होते. आजदेखील क्रिकेट शिष्टजनांचा खेळ असल्याचे सांगत ते म्हणाले, प्रत्येक खेळात जोश असतो. क्रिकेटमध्ये कधी कधी याचे प्रमाण जास्त होताना दिसते. कोणा एका खेळाडूचे मैदानावरील चिडणे पाहून आता हा खेळ चांगल्या लोकांचा राहिला नाही, असे म्हणणे उचित ठरणार नाही. क्रिकेटपटू भावनेच्या भरात चुका करतात. परंतु, कोणी खेळाडू पैशासाठी खेळ विकत असेल, तर ही बाब खूप वाईट असल्याचेदेखील त्यांनी बोलून दाखवले.