क्रिकेटवीर सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड यांच्यासह इतर काही भारतीय माजी क्रिकेटपटू भारतीने संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत खेळायला हवं अशी इच्छा व्यक्त केली आहे. इएसपीएन क्रिकइन्फोच्या माहितीनुसार, भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळायला हवं या पक्षात असलेल्या १२ माजी क्रिकेटपटूंमध्ये सचिन आणि द्रविड यांचाही समावेश आहे. तेंडुलकर, द्रविड यांच्यासह झहीर खान, गुंडप्पा विश्वनाथ, संदीप पाटील, संजय मांजरेकर, आकाश चोप्रा, अजित आगरकर, व्यंकटेश प्रसाद, सबा करीम, मुरली कार्तिक आणि दीप दासगुप्ता या माजी क्रिकेटपटूंनी टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळायला हवं, अशी भावना व्यक्त केली आहे. टीम इंडियाने आपले गतविजेतेपद कायम राखण्यासाठी प्रयत्न करायला हवा, असं या माजी क्रिकेटपटूंचं म्हणणं आहे.

 

आयसीसीकडून मिळणाऱ्या हिश्श्यात बदल केले जाणार असल्याने बीसीसीआय नाराज आहे. या पार्श्वभूमीवर बीसीसीआय आयसीसीच्या चॅम्पियन्स ट्रॉफीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेऊ शकते. येत्या ७ मे रोजी बीसीसीआयच्या विशेष सर्वसाधारण बैठकीत त्याबाबतचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. येत्या जून महिन्यात सुरू होणाऱ्या या स्पर्धेसाठी २५ एप्रिलपर्यंत प्रत्येक क्रिकेट बोर्डाला आपला संघ जाहीर करणे अनिवार्य असताना बीसीसीआयने अद्याप टीम इंडियाची घोषणा केलेली नाही. त्यामुळे स्पर्धेत टीम इंडियाच्या समावेशाबाबत साशंकता आहे.