20 February 2019

News Flash

सचिन गुरुजींच्या वर्गातील फेडररचा पहिला धडा ठरला…

सचिनने फेडररचा व्हिडीओ पाहून त्याचे कौतुक केले होते. त्यावर मी तुझ्याकडून क्रिकेटचे धडे घ्यायला तयार आहे, असे ट्विट फेडररने केले होते.

रॉजर फेडरर आणि सचिन तेंडुलकर यांच्यातील मैत्री सर्वश्रुत आहे. सचिन तेंडुलकर अनेकदा विम्बल्डन सामना पाहायला गेल्याचेही दिसून आले असून सचिनने आपले टेनिसप्रेम उघडपणे व्यक्त केले आहे. मात्र विम्बल्डन स्पर्धेतील फेडररच्या क्रिकेट शॉटची सार्वधिक चर्चा होताना दिसत असून यावरून ट्विटवर सचिन आणि फेडरर यांच्यात गप्पा रंगल्याचे दिसत आहेत. फेडररचा व्हिडीओ विम्बल्डनच्या अधिकृत ट्विटवरून ट्विट केल्यानंतर आयसीसीने त्याला कसोटी क्रिकेटमधील अव्वल फलंदाज असल्याची पावती दिली होती. तर सचिनकडून क्रिकेटचे धडे घेण्यासाठी फेडरर तयार झाला होता.

या संबंधी सचिनने पुन्हा एकदा फेडररला ट्विटच्या माध्यमातून उत्तर दिले आहे. ‘तुझ्यासाठी पहिला धडा असेल, स्ट्रेट ड्राइव्ह! तू मला टेनिसमध्ये बॅकहँड कसा मारावा, ते शिकव. त्याबदली मी तुला सरळ फटका कसा मारावा, हे सांगेन’, असे सचिनने ट्विट केले आहे. याशिवाय, यंदा विम्बल्डन स्पर्धा पाहण्यासाठी मी येऊ शकणार नाही. पण टीव्हीवर मी नक्की तुझे सामने पाहेन, असेही त्या ट्विटमध्ये म्हंटले आहे.

दरम्यान, सचिनने फेडररचा व्हिडीओ पाहून त्याचे कौतुक केले होते. हात आणि डोळे यांचा उत्तम समन्वय साधत तू हा शॉट खेळला आहेस. त्याबाबत तुझे अभिनंदन. आता आपण एकमेकांकडून क्रिकेट आणि टेनिसचे धडे घ्यायला हवेत, असे सचिनने यावर ट्विट केले होते. तू तुझे नववे विम्बल्डन विजेतेपद जिंकल्यावर आपण सुरुवात करू या, असेही त्याने नमूद केले होते.

त्यावर सचिनच्या ट्विटची दखल घेत फेडररने सचिनला उत्तर दिले होते. ही स्पर्धा संपण्याची वाट का पाहायची? मी तर आताही तुझ्याकडून क्रिकेटचे धडे घ्यायला तयार आहे, असे ट्विट त्याने केले होते.

त्यावर आता सचिनने उत्तर दिले आहे.

First Published on July 11, 2018 6:49 pm

Web Title: sachin tendulkar roger federer cricket tennis straight drive backhand