मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) क्रिकेट सुधारणा समितीमध्ये (सीआयसी) भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला विशेष स्थान देण्यात आले. एमसीएचे उपाध्यक्ष दिलीप वेंगसरकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या या समितीमध्ये भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांच्यासह संजय मांजरेकर, प्रवीण अमरे, डायना एडलजी, अजित आगरकर, अमोल मुझुमदार आणि दीपक पाटील यांचा समावेश आहे.
‘‘क्रिकेट सुधारणा समिती १४, १६, १९, २३ वर्षांखालील आणि वरिष्ठ गटांच्या संघांसाठी प्रशिक्षक, निवड समिती सदस्य आणि स्पर्धाचे स्वरूप निश्चित करण्याचे काम करील. याचप्रमाणे बीकेसी येथील इनडोअर अकादमीसाठी प्रशिक्षक निवडण्याचे कार्यसुद्धा करणार आहे. पुढील आठवडय़ात या समितीची बैठक होणार आहे. सचिन जेव्हा उपलब्ध असेल, तेव्हा तो बैठकांना जरूर हजेरी लावेल आणि त्याच्या अनुभवाचा मुंबईच्या क्रिकेटला नक्की फायदा होईल,’’ अशी माहिती  वेंगसरकर यांनी दिली.
जून महिन्यातच एमसीए महत्त्वाच्या समित्या स्थापन करीत असल्याने मुंबईला सर्व वयोगटातील संघबांधणीसाठी तीन महिन्यांचा पुरेसा वेळ मिळत आहे, असे ते पुढे म्हणाले. याचप्रमाणे दहा दिवसांचा अवधी मिळाल्यास मुंबई प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धासुद्धा खेळण्याचे प्रयोजन असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबई क्रिकेटमध्ये गेल्या काही वर्षांत शिस्तभंगाची प्रकरणे समोर आली होती. याबाबत वेंगसरकर म्हणाले, ‘‘बेशिस्तपणा खपवून घेतला जाणार नाही. १४ वर्षांखालील असो किंवा नावाजलेला क्रिकेटपटू त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. लवकरच शिस्तपालन समितीचीसुद्धा स्थापना करण्यात येणार आहे.’’

एमसीएच्या मतदारांना इनाम
एमसीएचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिल्याच कार्यकारिणी सभेत एमसीएच्या ३२९ सदस्यांना बीकेसी येथील क्लबचे एकेक सदस्यत्व इनाम दिले जाणार असल्याचे निश्चित केले.
कांगा लीग २ ऑगस्टपासून
मुंबई क्रिकेटच्या परंपरेत ऐतिहासिक महत्त्व असणाऱ्या कांगा लीग क्रिकेट स्पध्रेला पुनरुज्जीवन देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती या वेळी वेंगसरकर यांनी दिली. २ ऑगस्ट ते २५ ऑक्टोबर या कालावधीत ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे.
शाळा-महाविद्यालयांसाठी आणखी एक स्पर्धा
हॅरिस आणि गाइल्स ढाल स्पर्धा शालेय क्रिकेटमध्ये प्रचलित आहे. त्यांच्या जोडीने १४ आणि १६ वर्षांखालील व महाविद्यालयीन अशा तीन गटांसाठी आठ संघांचा समावेश असलेली प्रत्येकी एकेक क्रिकेट स्पर्धा यंदापासून सुरू करण्यात येणार आहेत.
सचिनच्या सल्ल्याचा गांभीर्याने विचार होणार
वांद्रे-कुर्ला संकुल येथील शरद पवार जिमखान्याच्या नामकरण कार्यक्रमात शालेय स्तरावर प्रत्येक संघात १५ खेळाडूंचा समावेश करण्यात यावा, अशी सूचना सचिनने केली होती. त्याबाबत गांभीर्याने विचार करण्यात येईल, असे वेंगसरकर यांनी सांगितले.
जाफरबाबत एमसीए अनभिज्ञ
रणजी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा नावावर असणारा मुंबईचा फलंदाज वासिम जाफर येत्या हंगामात विदर्भाकडून खेळणार, अशी चर्चा आहे. मात्र याबाबत एमसीएच्या पदाधिकाऱ्यांनी अनभिज्ञता प्रकट केली.