फलंदाजी कारकीर्द ही त्याच्या कामगिरीवर अवलंबून असते, तितकीच त्या खेळाडूंच्या फलंदाजीच्या क्रमांकावरही अवलंबून असते. एखाद्या विशिष्ट क्रिकेटपटूच्या कारकीर्दीसाठी फलंदाजीच्या क्रमावारीत करण्यात आलेल्या बदलामुळे चमत्कार कसे घडतात? या गोष्टी आम्ही अनेकदा ऐकल्या आहेत. २०१३ साली रोहित शर्माने भारतासाठी सलामीला खेळण्यास सुरूवात केली आणि तो पूर्णपणे वेगळाच खेळाडू म्हणून जगापुढे आला. असाच काहीसा चमत्कार विरेंद्र सेहवागच्या बाबतीत दिसून आला. सेहवाग सुरूवातीला मधल्या फळीत खेळत होता, पण नंतर तो सलामीवीर म्हणून खेळू लागला आणि जगातील सर्वात धोकादायक सलामीवीरांपैकी एक ठरला. सेहवागच्या फलंदाजीच्या क्रमवारीत हा बदल कोणामुळे घडला? याबद्दल भारताचा माजी खेळाडू अजय रात्रा याने एका मुलाखतीत माहिती दिली.

“सचिन त्यावेळी सलामीवीर म्हणून चांगली कामगिरी करत होता, पण सेहवागला सलामीवीर म्हणून खेळवायचे होते. त्यामुळे सचिनला चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची ऑफर देण्यात आली. त्यानंतर डाव्या आणि उजव्या हाताच्या फलंदाजांचा समन्वय साधण्यासाठी सेहवागसोबत गांगुली सलामीला यायला लागला. सचिनने जर त्यावेळी या गोष्टीला होकार दिला नसता तर सेहवागला खालच्या क्रमांकावरच फलंदाजी करत राहावं लागलं असतं. आणि त्याला जर वन डे सामन्यात सलामीची संधी मिळाली नसती तर सेहवागबाबतती कथा खूप वेगळी असू शकली असती”, असे रात्राने सांगितले.

“या निर्णयानंतर संघातील सचिनची भूमिका बदलली. चौथ्या क्रमांकावर खेळणाऱ्या सचिनवर किमान ४५ व्या षटकापर्यंत तळ ठोकून उभे राहण्याची जबाबदारी देण्यात आली. त्याने ती जबाबदारी छान पार पाडलीच पण महत्त्वाचे सेहवागबद्दलचा बदल चांगल्या पद्धतीने कामी आला आणि सेहवाग सलामीवीर म्हणून चांगलाच यशस्वी ठरला”, असे त्याने नमूद केले.