World Cup 2019 ही स्पर्धा ३० मे पासून सुरु होणार आहे. या स्पर्धेत १६ जूनला भारत पाकिस्तानशी भिडणार आहे. मात्र पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ भारताने पाकिस्तानशी सामना खेळू नये, असा सूर सर्वत्र उमटत आहे. यानंतर भारताचे दोन माजी खेळाडू सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांनी या मुद्द्यावर आपापली मते व्यक्त केली होती. या दोघांची मते एकमेकांविरोधात आहेत असे मानले जात होते. यावर गांगुलीने स्पष्टीकरण देत आमची मैत्री कधीच तुटणार नाही, असे म्हटले होते. यावर सचिनने ट्विट करत तुला काहीही स्पष्ट करण्याची गरज नाही, असे म्हटले आहे.

प्रसारमाध्यमांमध्ये मी सचिनच्या वक्तव्याला विरोध केला असे सांगितले जात आहे. पण मी केवळ मला भारताने विश्वचषक जिंकायला हवा आहे, असे वक्तव्य केले आहे. माझ्या मताचा सचिनच्या वक्तव्याशी काडीमात्र संबंध नाही. गेलीय २५ वर्षांहून अधिक काळ सचिन माझा चांगला मित्र आहे आणि यापुढेही आमची मैत्री अशीच टिकून राहिल, असे गांगुलीने ट्विट करून सांगितले होते.

यावर सचिनने पुन्हा गांगुलीला ट्विट करत म्हटले आहे की तुला तुझे म्हणणे पटवून देण्याची किंवा स्पष्टीकरण देण्याची काहीही गरज नाही. जे देशहिताचे आहे, तेच आपल्या साऱ्यांना हवे आहे.

दरम्यान, सुरुवातीला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने सामना रद्द करून पाकला २ फुकटचे गुण का द्यायचे? असा सवाल उपस्थित केला होता. त्यापेक्षा पाकिस्तानला पराभूत करून दहशतवादी हल्ल्याचा बदला घ्या, असेही वक्तव्य सचिनने केले होते. तसेच यानंतर त्याने ट्विट करूनही त्याने हा मुद्दा मांडला होता.

यावर सचिनला केवळ २ गुण हवेत, पण मला विश्वचषक भारताने जिंकायला हवा आहे, असे मत माजी कर्णधार सौरव गांगुली याने व्यक्त केले होते. या संदर्भात गांगुलीने सचिनच्या वक्तव्याला विरोध दर्शवला असे सोशल माध्यमातून म्हटले जात होते. पण माझा सचिनच्या वक्तव्याला विरोध नाही, असे गांगुलीने स्पष्टदेखील केले होते.