मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने क्रिकेट करिअरमध्ये अनेक मोठे रेकॉर्ड नावावर केले असून आजही कित्येक तरुणांपुढे त्याचा आदर्श आहे. मात्र आपल्या क्रिकेट करिअरमध्ये सचिन तेंडुलकरलाही अनेक समस्यांचा सामना करावा लागला. नुकतंच सचिन तेंडुलकरने २४ वर्षाच्या कारकिर्दीतील बराचसा भाग आपण चिंताग्रस्ततेचा सामना केला असल्याचा खुलासा केला आहे. हा आपल्या तयारीचा भाग आहे याची नंतर जाणीव झाल्याचंही सचिनने सांगितलं आहे.

करोनाच्या काळात मानसिक आरोग्याबद्दल बरीच चर्चा सुरु असून त्याला महत्वं दिलं जात आहे. खेळाडूंनी बायोबबलमध्ये आपला बराचसा वेळ घालवण्याबद्दल बोलताना सचिनने स्वीकार करणं हे महत्वाचं असल्याचं सांगितलं आहे.

“काळासोबत माझ्या लक्षात आलं की, खेळासाठी शारिरीक तयारीसोबतच मानसिक तयारीदेखील महत्वाची असते. मैदानात उतरण्याआधीच माझ्या डोक्यात फार आधी मॅच सुरु झालेली असायची. चिंताग्रस्त होण्याचं प्रमाण खूप होतं,” असा खुलासा सचिनने अनअकॅडमीकडून आयोजित चर्चेदरम्यान केला.

“मी जवळपास १० ते १२ वर्ष चिंताग्रस्ततेचा सामना केला. अनेक सामन्यांआधी मला झोप लागली नाही. पण यानंतर हा आपल्या तयारीचा भाग असल्याचं मी मान्य केलं. मनाला शांती मिळावी यासाठी मी काही गोष्टी करण्यास सुरुवात केली,” असं सचिन सांगतो. त्या काही गोष्टींमध्ये शॅडो बॅटिंग, टीव्ही पाहणे, व्हिडीओ गेम खेळणे यांचा समावेश होता. सकाळचा चहा करणं देखील मला खेळासाठी तयार होण्यात मदत करत होतं”.

“चहा करणे, कपडे इस्त्री करणे मला खेळाच्या तयारीत मदत करत होते. मी सामन्याच्या एक दिवस आधी बॅग पॅक करत असे. माझ्या भावाने मला हे शिकवलं होतं, नंतर तो सवयीचा भाग झाला. शेवटच्या सामन्यातही मी ही शिस्त पाळली होती,” असं सचिन सांगतो. २०१३ मध्ये २०० वा कसोटी सामना खेळल्यानंतर सचिनने निवृत्ती घेतली.

प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यात चढ आणि उतार येत असतात, ते स्वीकारण महत्वाचं असल्याचं सचिन म्हणतो. “जेव्हा जखम होते तेव्हा फिजिओ, डॉक्टर तपासतात आणि निदान करतात. मानसिक आरोग्याच्या बाबतीतही तसंच आहे. चढ उतार होणं हे प्रत्येकासाठी सामान्य आहे. जेव्हा उतार असतो तेव्हा आजुबाजूला आपले लोक हवे असतात. स्वीकारणं ही महत्वाची बाब आहे. फक्त खेळाडू नाही तर त्याच्या आजुबाजूला असणाऱ्या लोकांसाठीदेखील….जेव्हा तुम्ही स्वीकार करता तेव्हा उपाय शोधू लागता,” असं सचिनने सांगितलं आहे.

सचिनने यावेळी आपण कोणाकडूनही शिकू शकतो सांगताना चेन्नईमधील हॉटेल कर्मचाऱ्याची आठवण सांगितलं. डोसा घेऊन आलेल्या कर्मचाऱ्याने मला एल्बो गार्डमुळे बॅट स्विंग होण्यात मर्यादा येत असल्याचं सांगितलं होतं. याचा मला फायदा झाला अशी आठवण तेंडुलकरने सांगितली. सचिनने यावेळी करोना योद्ध्यांचे आभार मानले. नुकतीच सचिन तेंडुलकरनेही करोनावर मात केली आहे.