सचिन तेंडुलकर या नावाची महती अद्भुत आहे. क्रीडाविश्वाचा तारा असलेला सचिन हा अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. आयपीएल आणि फिफा विश्वचषकाचे पडघम वाजू लागले असतानाच भारतीय हॉकीपटू विश्वचषक अभियानासाठी प्रयाण करणार आहेत. या संघाचे सराव शिबीर दिल्लीत सुरू आहे आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी साक्षात सचिन तेंडुलकर अवतरला. आतापर्यंत ज्याच्या पराक्रमाच्या कहाण्या ऐकून मोठे झालेल्या हॉकीपटूंनी हा मंतरलेला क्षण जागवला आणि विश्वचषकात शानदार कामगिरी करण्याचा निर्धार केला. ३१ मे ते १५ जून या कालावधीत द हेग, नेदरलॅण्ड्स येथे विश्वचषक होणार आहे.
भारतीय हॉकी संघाचा कर्णधार सरदार सिंगच्या विनंतीवरून सचिनने या शिबिराला भेट दिली आणि सगळ्याच खेळाडूंना आश्चर्याचा धक्का बसला. सचिनने या खेळाडूंसह दोन तास व्यतीत केले आणि त्याच्या कारकिर्दीतील अनेक आठवणींना उजाळा दिला. ‘सचिनपाजींना खेळाडूंना भेटायला येण्याची विनंती मी केली होती. मोठय़ा स्पर्धेत, दडपणाखाली प्रदर्शन कसे करावे या संदर्भात त्यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करावे, अशी माझी इच्छा होती. सचिनने विनंतीला मान देऊन शिबिराला भेट दिली. या भेटीची मला दहा दिवस आधीच कल्पना होती. मात्र या गोष्टीची कल्पना मी प्रमुख प्रशिक्षक टेरी वॉल्श आणि उच्च कामगिरी संचालक रोलॅण्ट ओल्टमन्स यांना दिली होती. खेळाडूंना सुखद धक्का देण्याचा माझा विचार होता,’ असे सरदाराने सांगितले.
विश्वचषकासारख्या सर्वोच्च स्पर्धेसाठी उपयुक्त ठरतील अशा अनेक गोष्टी सचिनने खेळाडूंना सांगितल्या. क्रिकेटप्रमाणेच हॉकीही सांघिक खेळ असून, सगळ्यांची एकत्रित कामगिरी चांगली झाल्यासच विजय मिळू शकतो, असे त्याने पुढे सांगितले. दडपणाला तुमच्यावर स्वार होण्यास देऊ नका. तुमच्या खेळाचा आणि प्रतिस्पध्र्याच्या कच्च्या दुव्यांचा सखोल अभ्यास करा आणि सकारात्मक भावनेने खेळा, असे आवाहन सचिनने केले.
तेंडुलकरच्या भेटीबाबत प्रशिक्षक टेरी वॉल्श यांना विचारले असता ते म्हणाले, ‘सचिनसारख्या महान खेळाडूला भेटणे हा आमच्यासाठी सन्मान आहे. तो विचारी खेळाडू आहे. त्याच्या मार्गदर्शनाचा आणि प्रोत्साहनाचा खेळाडूंना फायदाच होईल.’