चाहत्यांसाठी सचिन तेंडुलकर हे दैवत असले तरी मी क्रिकेटमधील देव नाही, असे वक्तव्य खुद्द सचिननेच केले आहे. ‘‘मैदानावर मी अनेक चुका केल्या आहेत. क्रिकेट खेळायला मला आवडते. मी क्रिकेटमधील देव वगैरे काहीही नाही. मी एक सामान्य माणूस आहे,’’ असे सचिनने एका मुलाखतीदरम्यान सांगितले.
‘‘अनेक लोक माझ्यावर प्रेम करतात, यासारखे नशीबवान दुसरे काहीच नाही. माझ्यासाठी हीच मोठी पोचपावती आहे. माझ्या चढउतारात भरभरून पाठिंबा दिल्याबद्दल मी चाहत्यांचा ऋणी आहे. पण मला कुणीही देव मानू नये,’’ असेही त्याने सांगितले.
निवृत्तीनंतर माझे आयुष्य अधिक धावपळीचे बनले आहे. तो म्हणाला, ‘‘आयुष्याची दुसरी बाजू सध्या मी जगत आहे. गेली २४ वर्षे मी फक्त क्रिकेटवर लक्ष केंद्रित केले होते. अन्य कोणत्याही गोष्टींचा विचार मी करत नव्हतो. पण आता लोकांसाठी काही तरी करून दाखवण्यासाठी माझी धडपड सुरू आहे.’’ मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर चेन्नईत २००८मध्ये इंग्लंडविरुद्ध झळकावलेले शतक आयुष्यातील सर्वात महत्त्वाचे असल्याचे सचिनने सांगितले. तो म्हणतो, ‘‘जगभरातील भारतवासीयांसाठी तो काळ अतिशय खडतर होता. माझ्या शतकामुळे लोकांच्या चेहऱ्यावर किंचितसे का होईना, पण हसू पसरले होते. तोच माझ्यासाठी सर्वात समाधानकारक क्षण होता, असे मला वाटते.’’

सचिनचे आत्मचरित्र आता प्रादेशिक भाषांमध्येही!
मुंबई : सचिन तेंडुलकरच्या ‘प्लेइंग इट माय वे’ या आत्मचरित्राला वाढती मागणी लक्षात घेता, हे पुस्तक आता प्रादेशिक भाषांमध्येही प्रकाशित केले जाणार आहे. या पुस्तकाचा लवकरच मराठी, हिंदी, गुजराती, मल्याळम, आसामी, तेलुगू आणि बंगाली भाषांमध्ये अनुवाद केला जाणार आहे. मात्र त्यासाठी चाहत्यांना पुढील वर्षांच्या आगमनाची वाट पाहावी लागणार आहे