ICC World Cup २०१९ या स्पर्धेला थोडाच कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे या स्पर्धेत कोण आपली चमक दाखवणार? कोण या स्पर्धेचा विजेता ठरणार? अशा चर्चा रंगल्या आहेत. या चर्चेत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने आपले मत मांडले आहे. २०१९ च्या विश्वचषकात भारतीय संघच विजेतेपदासाठी लोकप्रिय आणि प्रबळ दावेदार आहे, असा विश्वास सचिन तेंडुलकर याने व्यक्त केला आहे.

‘भारतीय संघ संतुलित आहे. विश्वचषक स्पर्धेसाठी जेव्हा मी संघांचा विचार करतो, त्यावेळी मला भारतीय संघ प्रबळ दावेदार वाटतो. भारतीय संघात सर्वोत्तम खेळाडू आहेत. त्यामुळे भारताला विश्वचषक स्पर्धा जिंकण्याची सर्वाधिक संधी आहे’, असे सचिन ‘पीटीआय’शी बोलताना म्हणाला. याशिवाय न्यूझीलंडचा संघ भारताकडून एकदिवसीय मालिकेत पराभूत झाला आहे, तर इंग्लंडचा संघ कसोटी मालिकेत विंडीजकडून पराभूत झाला आहे. तसे असले तरी हे दोन संघही भारताला कडवी टक्कर देतील, असेही तो म्हणाला.

याशिवाय, भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्यावरही सचिनने स्तुतीसुमने उधळली. ‘बुमराह हा आपल्या धारदार गोलंदाजीने फलंदाजांना सळो की पळो करून सोडतो. मुंबई इंडियन्सकडून खेळताना मी त्याला जवळून पाहिले आहे. त्यामुळे विश्वचषक स्पर्धेत बुमराह हा भारतीय संघाचा हुकुमी एक्का ठरणार आहे’, असेही तो म्हणाला.