भारतीय संघाच्या एकूण देहबोलीत आता विराट कोहलीचा आक्रमकपणा दिसायला लागला आहे, असे वक्तव्य मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने केले आहे. पदार्पणातच कोहलीच्या आक्रमकतेची झलक पाहायला मिळाली होती. त्यानंतर आता त्याची आक्रमकता संपूर्ण टीममध्ये दिसत आहे, असे सचिनने म्हटले आहे. मुंबईतील एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमानंतर सचिनने पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्याने भारतीय संघाच्या कामगिरीचे कौतुक केले.

विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर यांच्यात नेहमीच तुलना झाल्याचे पाहायला मिळते. सध्याच्या घडीला सचिनचा शंभर शतकांचा विक्रम मोडीत काढण्याची क्षमता क्रिकेटविश्वात कोहलीशिवाय अन्य कोणत्याही खेळाडूत दिसत नाही. न्यूझीलंडविरुद्ध २०० व्या सामन्यात बहरदार शतकी खेळी करत विराटने सचिनच्या विक्रमाच्या जवळ जाण्यासाठी आणखी एक वीट रचली. मात्र, विराटच्या शतकानंतरही भारतीय संघाला पराभव स्वीकारावा लागला.

विराट कोहलीच्या खेळाबद्दल सचिन म्हणाला की, टीममध्ये पदार्पण केल्यापासून आतापर्यंत कोहलीच्या खेळण्याच्या शैलीत कोणाताही बदल झालेला नाही. पदार्पणातच त्याची आक्रमकता लक्षात आली होती. त्याच्या आक्रमकेतवर काहीजणांनी टीका देखील केली. मात्र, याच आक्रमक स्वभावामुळे भारतीय संघातही आता आक्रमकता पाहायला मिळत आहे. सध्याच्या घडीला भारतीय संघात समतोल असल्याचेही सचिन यावेळी म्हणाला.

संघाबद्दल तो म्हणाला की, सध्याच्या संघात समतोल पाहायला मिळतो. गोलंदाज वेळप्रसंगी फलंदाजीतील कसब दाखवून देत आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भुवनेश्वरने चांगली खेळी केल्याचा दाखला सचिनने यावेळी दिला. याशिवाय , भारताबाहेर खेळताना हार्दिक पांड्यासारख्या खेळाडुंमध्ये सामन्याचे चित्र बदलण्याची क्षमता असल्याचे तो म्हणाला.