क्रिकेटविश्वात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद आहे. ४ जानेवारी ही तारीख देखील सचिनच्या एका अनोख्या विक्रमामुळे नोंदवली गेली आहे. सचिनने ठोकलेल्या शंभर शतकांपैकी चार शतकं ही एकाच तारखेला ठोकली गेली आहेत. सचिनने ४ जानेवारी १९९७ रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केपटाऊनमध्ये शतक ठोकले होते, तर ४ जानेवारी २००४ साली सचिनने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत आपले ३२ वे शतक साजरे केले होते. त्यानंतर पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाविरुद्धच ४ जानेवारी २००८ साली सचिनने सिडनी क्रिकेट स्टेडियमवर आपले ३८ वे शतक ठोकले होते. याशिवाय, कसोटी क्रिकेटमधील आपले शेवटचे आणि ५१ वे शतक देखील सचिनने ४ जानेवारी २०११ साली केले होते. वरील चारही शतकं सचिनच्या कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरलेली आहेत. सचिनची ही चारही कसोटी शतकं आहेत. चारही कसोटी सामन्यात भारतीय संघाला विजय नोंदविता आला नसला तरी संघ संकटात असताना सचिनने मैदानात टिच्चून फलंदाजी करत सामना अनिर्णीत राखण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. त्याशिवाय चारही शतके परदेशात ठोकलेली आहेत. सचिनने ४ जानेवारी या एकाच तारखेला ठोकलेल्या या शतकांचा योगायोग देखील एका अनोख्या विक्रमाची नोंद करणारा ठरला. एकाच तारखेला चार शतके ठोकणारा सचिन तेंडुलकर हा पहिलाच फलंदाज आहे.

४ जानेवारी आणि सचिनची शतकं-

–  ४ जानेवारी १९९७ : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या केप टाऊन कसोटीत सचिनची १६९ धावांची खेळी.

– ४ जानेवारी २००४ : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिडनी कसोटीत सचिनची नाबाद २४१ धावांची खेळी.

– ४ जानेवारी २००८ : ऑस्ट्रेलियाविरुद्ध पुन्हा एकदा सिडनी स्टेडियमवर सचिनची नाबाद १५४ धावांची खेळी.

– ४ जानेवारी २०११ : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केप टाऊनमध्ये सचिनची १४६ धावांची खेळी.