भारताचा कर्णधार विराट कोहली याने नुकतेच विंडिज दौऱ्यावर संघाचे यशस्वी नेतृत्व केले. भारताने टी २०, एकदिवसीय आणि कसोटी मालिका जिंकली. विराटने या आधीही अनेक दौऱ्यांवर भारतीय संघाचे नेतृत्व करत संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. विराटने नुकतीच एक मुलाखत दिली. त्यात त्याने विविध प्रश्नांची उत्तर दिली आणि काही खास किस्सेही सांगितले. त्यातच त्याने सचिनच्या निरोपाचा सामन्याबाबतही एक किस्सा सांगितला.

“सचिनचा निरोपाचा सामना मुंबईत होता. जसेजसे आम्ही मुंबईच्या जवळ पोहोचत होतो, तसे आमच्या मनात एक विचार सुरू झाला की या सामन्यानंतर सचिन आमच्यासोबत नसणार. सचिन स्वत: खूपच भावनिक झाला होता. मी ज्या व्यक्तीकडे पाहून खेळायला सुरूवात केली त्याचा निरोपाचा सामना हा कल्पनेने मलादेखील गहिवरून आले होते. निरोपाचा सामना संपल्यानंतर अखेर मी सचिनला एक पवित्र धागा भेट म्हणून दिला”, असे विराटने सांगितले.

“माझ्या वडिलांनी मला एक पवित्र धागा दिला होता. तो धागा मी कायम माझ्या बॅगेत ठेवत असे. निरोपाच्या सामन्याच्या वेळी तो धागा मी सचिनला दिला. २४ वर्षे सचिनने सतत भारताची सेवा केली. त्यामुळे मला त्याला सगळ्यात मौल्यवान भेट द्यायची होती. वडिलांनी मला दिलेला तो धागा माझ्यासाठी खूप खास होता आणि मला सचिनमुळेच क्रिकेट खेळण्याची प्रेरणा मिळाली त्यामुळे मी त्याला तो पवित्र धागा दिला”, असे तो म्हणाला.

दरम्यान, याच मुलाखतीदरम्यान त्याने त्याच्या वडिलांच्या निधनाच्या घटनेबाबतही मन मोकळे केले. त्यांच्या अकाली निधनामुळे विराटने भारतीय संघातून क्रिकेट खेळण्याचा निर्णय मनात पक्का केला होता हे त्याने कबूल केले.