क्रिकेटचं साहित्य बनवणाऱ्या स्पार्टन कंपनीविरोधातील न्यायालयिन लढ्यात सचिन तेंडुलकरने बाजी मारली आहे. करार संपल्यानंतरही आपल्या नावाचा वापर करत कंपनीने बाजारात उत्पादनं प्रमोट केल्याचा आरोप करत सचिनने ऑस्ट्रेलियातील फेडरल कोर्टात दावा ठोकला होता. यावेळी सचिनने कंपनीवर करारामधील नियमांचं पालन न करणे, ब्रँड एंडोर्समेंटसाठी ठरलेली रक्कम न देण्याचाही ठपका ठेवला होता. अखेरीस कंपनीने आपली चूक मान्य करत सचिनची माफी मागितलेली आहे.

स्पार्टन कंपनीच्या प्रमोशनसाठी मुंबई आणि लंडनमध्ये काही कार्यक्रमही केले होते. मात्र कंपनीने करारातील सर्व नियमांचा भंग केल्याचा आरोप सचिनने केला होता. अखेरीस दोन्ही पक्षांमध्ये झालेल्या समजुतीनंतर, आपली चूक मान्य करत कोर्टाच्या आदेशानुसार सचिनचं नाव किंवा त्याचा फोटो आपल्या उत्पादनांवर न वापरण्याचं मान्य केलं आहे. १७ डिसेंबर २०१८ नंतर स्पार्टन आणि सचिन यांच्यातला करार अधिकृतरित्या संपलेला आहे, यानंतरच्या कोणत्याही उत्पादनांसाठी कंपनी सचिनचं नाव वापरणार नाही असं स्पार्टनचे संलाचक लेस गलाब्रेथ यांनी स्पष्ट केलं. दरम्यान या प्रकरणात दोन्ही पक्षांनी फारसा वाद न वाढवता मैत्रीपूर्ण तोडगा काढल्याबद्दल सचिननेही समाधान व्यक्त केल्याची माहिती, SRT Sports Management कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मृणमॉय मुखर्जी यांनी दिली.