भारतीय क्रिकेटचा माजी खेळाडू सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांच्यातल्या मैत्रीचे किस्से अनेकांनी ऐकले असतील. शालेय वयापासून दोन्ही खेळाडूंनी आचरेकर सरांच्या हाताखाली क्रिकेटचे धडे घेतले. यानंतर दोन्ही खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व केलं. सचिनने संपूर्ण जगावर राज्य केलं, मात्र कांबळीची कारकीर्द अल्पकाळाची ठरली. मध्यंतरी या दोन्ही मित्रांमध्ये काही कारणामुळे दुरावा आला होता, पण दोघांमधल्या क्रिकेटच्या आवडीमुळे ते एकत्र आले.

सचिन तेंडुलकरने आज आपल्या ट्विटर अकाऊंटवर जुन्या आठवणींमध्ये रमलेला पहायला मिळाला. सचिनने विनोद कांबळीसोबतचा आपला जुन्या काळातला फोटो शेअर करत, “कांबळ्या मला आपला जुना फोटो सापडलाय असं म्हणत” विनोद कांबळीला टॅग केलं.

विनोद कांबळीनेही आपल्या जुन्या मित्राच्या ट्विटला प्रतिसाद देत, आपल्या जुन्या काळातील सरावादरम्यानचा एक किस्सा सांगितला.

विनोदने सांगितलेला हा किस्सा ऐकून सचिनही, कसा विसरु शकतो?? तू इकडे का येत नाहीस, आपण परत काहीतरी धमाल करु असं म्हणाला.

सचिन आणि विनोदच्या या मराठमोळ्या संभाषणाला नेटकऱ्यांनीही चांगला प्रतिसाद दिला आहे.