पायानं कॅरम खेळता येऊ शकतं का, या प्रश्नाचं उत्तर सहसा नाही असंच येईल. पण भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनं शेअर केलेला व्हिडिओ पाहून तुमचं उत्तर ‘हो’ मध्ये बदलेल एवढं नक्की. सचिननं ‘मंडे मोटीवेशन’ म्हणून पायानं कॅरम खेळणाऱ्या हर्षद गोठणकरचा प्रेरणादायी व्हिडिओ शेअर केला आहे. जन्मतःच हात नसलेल्या हर्षदची गुणवत्ता पाहून सचिनलाही नवल वाटलं आहे.

”एका निर्धारावर शक्य आणि अशक्य गोष्टी अवलंबून असतात. हर्षद गोठणकरनं आय-एम-पॉसिबलची निवड केलीय. गोष्टी शक्य करण्यासाठी मार्ग शोधण्याची त्याची प्रेरणा मला आवडलीय. ही गोष्ट आपणही त्याच्याकडून शिकू शकतो”, असे कॅप्शन देत सचिननं हा व्हिडिओ आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे.

 

हर्षदचे वडील आहेत रिक्षाचालक

हर्षद गोठणकरनं महर्षी दयानंद महाविद्यालयात मास्टर ऑफ कॉमर्स केलं आहे. विविध ठिकाणी प्रदर्शनीय सामने खेळायलाही तो जातो. हर्षदचं वडील शंकर गोठणकर हे रिक्षाचालक आहेत. कुर्ला, घाटकोपर भागात रिक्षा चालवून घरासाठी दिवसरात्र झिजतात. हर्षदला सांभाळण्यासाठी त्यांना नोकरी सोडावी लागली आणि नंतर त्यांनी रिक्षा चालविण्यास सुरुवात केली. आपल्या मुलावर वाईट परिस्थिती ओढवू द्यायची नाही, असं त्यांनी मनाशी पक्कं केलं होतं.

हेही वाचा – VIDEO : विकेट काढली कोणी?; झिम्बाब्वे आणि बांगलादेश सामन्यातील रहस्यमय प्रकारावरुन खेळाडूही गोंधळले

हर्षद आधी फुटबॉलही खेळायचा. पण तोल सांभाळताना अडचणी येऊ लागल्या आणि त्याने कॅरमकडे वळण्याचा निर्णय घेतला. वडिलांनीच त्याला कॅरमचे धडे दिले. हर्षदनं याआधी आंतरराष्ट्रीय स्तरावर कॅरम खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती.