मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा क्रिकेटचा देव या नावाने ओळखला जातो. त्याने २४ वर्षांच्या समृद्ध कारकिर्दीत अनेक गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. महान गोलंदाज शेन वॉर्न याने तर सचिनची फटकेबाजी स्वप्नातही मला सतावते असे कबूल केले होते. पण खुद्द सचिनने एका गोलंदाजांचे नाव घेत तो गोलंदाज महान गोलंदाजांपैकी एक आहे, असे म्हटले आहे.

दक्षिण आफ्रिकेचा जलदगती गोलंदाज डेल स्टेन याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. ३६ व्या वर्षी स्टेनने कसोटी क्रिकेटला अलविदा म्हटले. कसोटी क्रिकेटमध्ये कोणत्याही आफ्रिकन गोलंदाजाला स्टेनसारखी कामगिरी करुन दाखवता आली नव्हती. कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली असली, तरीही आपण वन-डे आणि टी-२० क्रिकेट खेळणार असल्याचेही स्टेनने स्पष्ट केले. त्याला भविष्यासाठी शुभेच्छा देताना सचिन म्हणाला की माझ्या २४ वर्षांच्या कारकिर्दीत मी अनेक चांगल्या गोलंदाजांचा सामना केला. त्यापैकी डेल स्टेन हा एक आहे. तो सर्वच प्रकारचे चेंडू चांगले टाकतो, पण त्याचा उशिराने होणार आऊट स्विंग चेंडू खेळण्यासाठी नक्कीच अवघड असायचा.

त्याच्या सारखी गोलंदाजी करणारा आता फक्त जेम्स अँडरसन हा एकमेव गोलदांज आहे. दोघांच्या मनगटाची स्थिती समान असते. पण स्टेनच्या रन आपमुळे तो कमी वेळात क्रीजपर्यंत पोहोचतो. त्यातही त्याच्या स्विंगला वेगाची जोड असणे हे फलंदाजाला अजून घातक ठरते. तो जेव्हा त्याच्या सुवर्णकाळात होता, तेव्हा त्याने ताशी १५० किमीच्या गतीने गोलंदाजी केली आहे. त्यामुळे त्याने टाकलेले चेंडू खेळणे कायम अवघड ठरते, असेही सचिन म्हणाला.

मला त्याच्या गोलंदाजीवर खेळताना मजा आली. त्याच्या कारकिर्दीसाठी अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा, या शब्दात त्याने स्टेनविषयीच्या भावना व्यक्त केल्या.