मोहालीच्या मैदानात कर्णधार रोहित शर्माने तिसऱ्यांदा द्विशतक करुन सर्वांना थक्क केले. रोहितच्या या कामगिरीनंतर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरु झाला. रोहितच्या तुफान खेळीनं क्रिकेट चाहत्यांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. रोहितची या खेळीने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही भारावून गेलाय. सचिनने ट्विट करून रोहित शर्माला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘तुझी खेळी एक वेगळाच आनंद देणारी होती’, असा उल्लेख त्याने ट्विटमध्ये केलाय.

२०१० मध्ये मास्टर ब्लास्टरने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात वनडेतील पहिले द्विशतक झळकावले होते. विशेष म्हणजे जेव्हा सचिनला एका कार्यक्रमामध्ये तुझा द्विशतकाचा विक्रम कोण मोडेल, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी सचिनने रोहित शर्माचे नाव सांगितले होते. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात २०९ धावांची खेळी करुन रोहितने सचिनचा शब्द खरा करुन दाखवला. त्यानंतर ईडन गार्डन्सच्या मैदानात श्रीलंकेविरुद्धच त्याने २६४ धावांची दमदार खेळी केली होती. या शतकासह त्याने सर्वाधिक द्विशतके करण्याचा विक्रम आपल्या नावे केला.

सचिननं द्विशतक झळकावल्यानंतर एका वर्षाने वीरेंद्र सेहवागने द्विशतक केले. त्यानंतर एका वर्षाने रोहितने हा पराक्रम केला. वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल (२१५) आणि मर्टिन गप्तिल नाबाद २३७ धावा केल्या. मात्र, रोहित शर्मानं तब्बल तीनवेळा हा पराक्रम करुन एक नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. त्याचा हा विक्रम मोडणे सध्याच्या घडीला अशक्यप्राय दिसत आहे.