खेळाडूंना नोकरीची हमी देण्याच्या महत्त्वाच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रीत करून माजी क्रिकेटवीर सचिन तेंडुलकर याने बहुराष्ट्र कंपन्यांनी खेळाडूंना नोकऱया द्यायला हव्यात, असे आवाहन केले. सचिन म्हणाला की, खेळाडू दिवसभर आपल्या खेळावर लक्ष केंद्रीत करून खूप मेहनत घेत असतात. मात्र, आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने काही प्रतिभावान खेळाडू नेहमी दुर्लक्षित राहतात. सध्याच्या स्पर्धेच्या जगात रोजगाराची हमी असणे खूप कठीण असताना बहुराष्ट्रीय कंपन्यांनी पुढाकार घेऊन प्रतिभावान खेळाडूंना नोकरीची हमी द्यायला हवी. याआधीच्या काळात खेळाडूंना नोकरीची हमी होती, पण सध्याचे चित्र बदलले आहे. रोजगार मिळवण्याच्या स्पर्धेत टीकून राहणे जिकरीचे होऊन बसले आहे.

वाचा: सचिनच्या दत्तक गावाचा कायापालट

मुंबई पोलीस जिमखाना आयोजित क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरणाच्या कार्यक्रमात सचिन उपस्थित होता. त्यावेळी बोलत असताना सचिनने युवा खेळाडूंना मार्गदर्शन देखील केले. खेळाडूंच्या मनात रोजगाराची चिंता निर्माण होत असली तरी त्याचा जास्त विचार न करता आपल्याला ज्याची आवड आहे. त्यावर लक्ष केंद्रीत करावे. खेळाडूंनी आपला खेळात जास्तीत जास्त कशी सुधारणा होईल यावर भर द्यायला हवा आणि मुंबईतील क्रिकेटचे वातारण पाहता येथे खूप सकारात्मकता दिसून येते. मुंबईतील खेळाडू कौशल्याच्या बाबतीत कुठे कमी पडतात असे अजिबात नाही. प्रतिभावान खेळाडू मुंबई क्रिकेटने घडवले आहेत. खेळाडू तयार होत असले तरी सध्या नोकरीची हमी मिळण्याचे प्रमाण कुठेतरी घसरत जात असल्याचे दिसून येते, असे सचिन म्हणाला.

वाचा: आहे मनोहर तरी..

पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम झाल्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना सचिनने बहुराष्ट्रीय आणि खासगी कंपन्यांना जाहीर आवाहन केले. सचिन म्हणाला, बहुराष्ट्रीय कंपन्यांना पुढे येऊन खेळाडूंना आधार द्यायला हवा, त्यांना नोकरीची हमी द्यावी, असे या व्यासपीठावरून सर्व कंपन्यांना आवाहन करतो.