‘रणजी किंग’ मुंबईकर वसिम जाफर हा भारतीय क्रिकेटमधील रनमशीन. जाफरने भारतीय क्रिकेट अत्यंत जवळून पाहिलं आणि अनुभवलं. काही कारणांमुळे जाफरला भारतीय संघात स्थान मिळवणं आणि टिकवून ठेवणं अवघड गेलं. पण रणजी सामन्यांचा मास्टर खेळाडू म्हणून तो ओळखला जातो. वसिम जाफरने काही दिवसांपूर्वी त्याच्या पसंतीचा सर्वकालीन सर्वोत्तम भारतीय खेळाडूंचा एक वन डे संघ जाहीर केला होता. त्यात त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, सध्याचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा तिघांचा समावेश केला. या तिघांपैकी सर्वोत्तम क्रिकेटपटू कोण? याबद्दल त्याने नुकतेच उत्तर दिले.

वसीम जाफरने नुकतीच क्रीकट्रॅकरला एक मुलखात दिली. त्यात त्याला सचिन, विराट आणि रोहित यापैकी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडूचे नाव सांगायला सांगितले. या अवघड प्रश्नाचे त्याने सहज उत्तर दिले. जाफरने या प्रश्नाचे उत्तर देताना विराट कोहलीचे नाव घेत तो वन डे आणि टी-२० क्रिकेटमधील सर्वोत्तम भारतीय खेळाडू असल्याचे सांगितले. सचिनच्या नावे ४६३ वन डे सामन्यात १८,४२६ धावा आहेत. त्याने ४४.८३ च्या सरासरीने खेळताना ४९ शतके ठोकली होती. त्या तुलनेत विराटची आकडेवारी पाहता त्याने २४८ वन डे सामन्यात ४३ शतके ठोकली असून ११,८६७ धावा केल्या आहेत. तर रोहितच्या नावे वन डे मध्ये २९ शतके आणि ३ द्विशतके समाविष्ट आहेत. तसेच त्याने वन डे क्रिकेटमध्ये ९,११५ धावा केल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी वसिम जाफरने एक संघ जाहीर केला होता. त्या जाहीर केलेल्या संघात त्याने सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुलीला सलामीवीर म्हणून निवडले. तर रोहित शर्मा, विराट कोहली आणि युवराज सिंग यांना मधल्या फळीत स्थान दिले. यष्टीरक्षक आणि कर्णधार म्हणून त्याने महेंद्रसिंग धोनीची निवड केली. तर अष्टपैलू खेळाडूंसाठी त्याने कपिल देव आणि रविंद्र जाडेजा / हरभजन सिंग यांना पसंती दर्शवली. गोलंदाजांच्या ताफ्यात त्याने अनिल कुंबळे, जहीर खान आणि जसप्रीत बुमराह यांना स्थान दिले. त्याने स्वत: निवडलेला संघ आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला. या ट्विटवर भारताचा फिरकीपटू याने वसिम जाफरला संघातून सेहवागला वगळ्याबद्दल सवाल केला होता. त्यावर जाफरनेही त्याला झकास उत्तर दिले होते.