टीम इंडियाने महिला टी २० विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडचा अटीतटीच्या लढतीत ३ धावांनी पराभव केला. सलामीवीर शफाली वर्मा (४६) आणि तानिया भाटीया (२३) यांच्या दमदार खेळीच्या जोरावर भारताने न्यूझीलंडला १३४ धावांचे आव्हान दिले होते. आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडला केवळ १३० धावाच करता आल्या. भारताने या विजयासह उपांत्य फेरीत प्रवेश केला. सामन्यात ४६ धावांची खेळी करणाऱ्या शफालीला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. त्यानंतर मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि विरेंद्र सेहवाग यांनी शफालीचं तोंडभरून कौतुक केलं आहे.

IND vs NZ : दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियात बदल, ‘या’ खेळाडूंना मिळू शकतो डच्चू

“भारताच्या संघाने धमाकेदार कामगिरी केली. टी २० विश्वचषक २०२० स्पर्धेत सर्वप्रथम उपांत्य फेरी गाठल्याबद्दल अभिनंदन. न्यूझीलंड विरूद्धचा सामना अटीतटीचा होता आणि आपण दडपणाच्या स्थितीत चांगली खेळी केली. शफाली वर्माची फटकेबाजी बघून मजा आली”, अशा शब्दात सचिनने तिची स्तुती केली. त्यावर “तुम्ही माझी स्तुती केल्याबद्दल मला खूप आनंद आहे. मी नेहमी सर्वोत्तम कामगिरी करत राहिन” असे शफालीने ट्विट केले.

सध्या ‘जगात भारी’ गोलंदाज कोण? ग्लेन मॅकग्रा म्हणतो…

“व्वा! अटीतटीच्या लढतीत भारतीय महिला संघाने शांत आणि संयमी कामगिरी केली. त्यामुळेच दडपणाच्या स्थितीत भारताला न्यूझीलंडवर विजय मिळवता आला आणि उपांत्य फेरीत धडक मारता आली. शफाली वर्मा रॉकस्टार आहे. महिला संघाची कामगिरी पाहून खूप प्रसन्न वाटतंय”, असे ट्विट सेहवागने केले. त्यावरही शफालीने सेहवागचे आभार मानले.

IND vs NZ : दुसऱ्या कसोटीआधी भारताला धक्का… दुखापतीमुळे ‘हा’ खेळाडू स्पर्धेबाहेर

दरम्यान, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने पहिला बळी लवकर गमावला. स्मृती मानधना ११ धावांवर बाद झाली. स्मृती लवकर बाद झाल्यावर शफाली वर्मा आणि तानिया भाटीया यांनी चांगली भागीदारी केली. त्यानंतर यष्टीरक्षक तानिया भाटीया (२५ चेंडूत २३ धावा) फटकेबाजी करताना झेलबाद झाली. त्यानंतरच्या फलंदाजांनी निराशा केली. मुंबईकर जेमिमा (१०), कर्णधार हरमनप्रीत (१), अनुभवी वेदा कृष्णमूर्ती(६), दिप्ती शर्मा (८) स्वस्तात बाद झाल्या. अखेर राधा यादवने फटकेबाजी करत भारताला १३३ धावांचा टप्पा गाठून दिला.

Video : मुंबईकर महिला क्रिकेटरचा भन्नाट डान्स; अश्विनही झाला फिदा

१३४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सलामीवीर प्रिस्ट १२ धावा करून माघारी परतली. पाठोपाठ अनुभवी सुझी बेट्सदेखील त्रिफळाचीत होऊन तंबूत परतली. कर्णधार सोफी डिव्हाईनही १४ धावा करून बाद झाली. त्यामुळे न्यूझीलंडची अवस्था ३ बाद ३४ झाली होती. त्यानंतर मॅडी ग्रीन आणि केटी मार्टीन यांनी डाव सावरला. या दोघींनी ४३ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. अखेर राजश्री गायकवाडने जमलेली जोडी फोडली. फलंदाज मॅडी ग्रीन २४ धावांवर बाद झाली. लगेच केटी मार्टीनही २५ धावा करून माघारी परतली. त्यानंतर अमेलिया किर हिने तुफान फटकेबाजी केली. तिने ६ चौकार लगावत १९ चेंडूत नाबाद ३४ धावा केल्या. पण एका चेंडूत ५ धावा हव्या असताना अखेर न्यूझीलंडला ३ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.