माजी क्रिकेटपटू आणि राज्यसभेचा खासदार सचिन तेंडुलकरने आंध्र प्रदेशातील कंद्रिका गावाला भेट दिली. खासदार आदर्श ग्राम योजनेअंतर्गत सचिनने कंद्रिका गाव दत्तक घेतले आहे. कंद्रिका गावाला दिलेल्या भेटीदरम्यान सचिनने ग्रामस्थ आणि अधिकाऱ्यांसोबत संवाद साधला.

आंध्र प्रदेशमधील नेल्लोरे जिल्ह्यातील कंद्रिका गावात सचिनच्या खासदार निधीतून अनेक महत्त्वपूर्ण कामे झाली आहेत. सचिनने कंद्रिका गावाला दिलेल्या भेटीदरम्यान समाज विकास केंद्राच्या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. स्वच्छ भारत अभियानाबद्दल सचिन तेंडुलकरने ग्रामस्थांशी बातचीत केली.

केंद्र सरकारच्या खासदार आदर्श ग्राम योजनेच्या विविध मापदंडांमध्ये कंद्रिका गाव सर्वोत्कृष्ट ठरले आहे. सचिनने दोन वर्षांपूर्वी कंद्रिका गावातील विविध लोकोपयोगी कामांचे भूमीपूजन केले. विशेष म्हणजे सचिन दोन वर्षांपूर्वी ज्या दिवशी कंद्रिका गावात गेला होता, त्याच्या बरोबर एक वर्ष आधी सचिन क्रिकेटमधून निवृत्त झाला होता.

सचिनने आदर्श खासदार ग्राम योजनेत कंद्रिका गावाची निवड केल्याने गावाचे रुपडे पालटले आहे. गावात तयार करण्यात आलेल्या मैदानावर मुलांना क्रिकेट खेळता यावे, यासाठी सचिनने यावेळी क्रिकेट बॅट आणि किटचे वाटप केले.

सचिन तेंडुलकरने खासदार आदर्श ग्राम योजनेअंतर्गत आंध्र प्रदेशातील कंद्रिका गाव नोव्हेंबर २०१४ मध्ये दत्तक घेतले. कंद्रिका गावात ६२७ घरे असून गावाची लोकसंख्या १,८९५ इतकी आहे. फलोत्पादन, मासेमारी आणि पशूसंवर्धन यावर ग्रामस्थांचा उदरनिर्वाह चालतो.

सचिनने कंद्रिका गाव दत्तक घेण्यापूर्वी गावात संपूर्ण अंधार होता. मात्र आत्ता गावात २४ तास वीज असते. दोन वर्षांआधी कंद्रिका गावातील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत होती. मात्र आता कंद्रिका गावाला व्यवस्थित पाणी पुरवठा होतो आहे. गावातील प्रत्येक घरात पाण्याचा मीटरदेखील आहे.