क्रिकेटचे सामने सुरु असोत किंवा नसोत सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांच्यातली तुलना हा क्रिकेट प्रेमींसाठी एक कळीचा मुद्दा असतो. विराट सचिनचे विक्रम मोडणार का यावर अनेकदा सोशल मीडियात चर्चा रंगताना दिसते. भारतीय संघाच्या कर्णधारपदाची धूरा हाती घेतल्यानंतर विराटने आपल्या फलंदाजीत कमालीची सुधारणा केली आहे, आतापर्यंत विराटने सचिनचे अनेक विक्रम मोडीतही काढले आहेत. मात्र काही सचिनप्रेमींच्या मते विराट सचिनचे विक्रम मोडू शकणार नाही. पाकिस्तानचे माजी दिग्गज खेळाडू सरफराज नवाझ हे विराट कोहलीच्या फलंदाजीवर भलतेच खूश असून विराट सचिनचे सर्व विक्रम मोडेल असं भाकीत त्यांनी वर्तवलं आहे.

“माझ्या मते विराटची कोणाशीही तुलना होऊ शकत नाही. तो सचिनचे सर्व विक्रम नक्की मोडेल. सचिनला इन-स्विंग चेंडू खेळताना नेहमी त्रास व्हायचा, तो त्याचा कच्चा दुवा होता. पण विराट कोहलीच्या फलंदाजीत तुम्हाला मुश्किलीने एखादा कच्चा दुवा सापडेल. सुरुवातीच्या दिवसांत तो आऊट स्विंग खेलताना गडबडायचा, मात्र सध्या तो त्याच्या कारकिर्दीत शिखरावर आहे.” सरफराज नवाझ इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शंभर शतकांसह सर्वाधिक धावा असे अनेक विक्रम सचिनच्या नावावर जमा आहेत.

दरम्यान सध्या करोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे सर्व क्रिकेट स्पर्धा रद्द करण्यात आलेल्या आहेत. बीसीसीआयने आयपीएलचा तेरावा हंगामही पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केला आहे. मात्र ही स्पर्धा रद्द झाल्यास बीसीसीआयला अंदाजे ४ हजार कोटींचं नुकसान होण्याची शक्यता आहे. यासाठी वर्षाअखेरीस ही स्पर्धा भरवता येते का याची चाचपणी बीसीसीआय करत आहे. आयपीएलमध्ये विराट RCB संघाचं नेतृत्व करतो.