२०१९ साली इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडने न्यूझीलंडवर मात करत विजेतेपद पटकावले. मात्र मर्यादित षटके आणि सुपर ओव्हरमध्येही सामना अनिर्णित राहिल्यामुळे इंग्लंडला अधिक चौकारांच्या निकषावर विजेता जाहीर करण्यात आले होते. ICC च्या या निर्णयावर नंतर टीकाही करण्यात आली. अखेरीस ICC ने तो वादग्रस्त नियम रद्द केला. सोमवारी ICC ने या संदर्भात पत्रक जाहीर करत माहिती दिली.

ICC च्या स्पर्धांमध्ये सामना अनिर्णित राहिल्यास सुपर ओव्हरमध्ये निकाल लावण्यात येण्याचा नियम कायम असणार आहे. मात्र साखळी फेरीत जर सुपर ओव्हरवर सामना अनिर्णित राहिला, तर तो अधिकृतरित्या अनिर्णित घोषित केला जाईल. पण बाद फेरीत सुपर ओव्हरमध्ये सामना अनिर्णित राहिला, तर पुन्हा एकदा सुपर ओव्हर खेळवण्यात येईल, असा नवा नियम ICC ने केला.

या नियमाचे सचिनने स्वागत केले. “सुपर ओव्हर संदर्भातील हा नियम बदलला हे चांगले झाले. ICC केलेला बदल स्तुत्य आहे. सामन्यात जर दोन संघांमध्ये कोणी एक बलाढ्य ठरत नसेल, तर सामन्याचा विजेता मिळण्यासाठी ही सर्वात नि:पक्षपाती पद्धत आहे”, असे सचिनने ट्विट केले.

दरम्यान, या नियम बदलावर न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू जेम्स निशम याने ICC ला खोचक टोला लगावला. काही वर्षांपूर्वी टायटॅनिक नावाच्या मोठ्या प्रवासी जहाजाला हिमनगाला धडकल्याने जलसमाधी घ्यावी लागली. त्या अपघातात अनेक लोक मरण पावले. त्यानंतर इतर प्रवासी जहाजांवर दुर्बिणी देण्याचा फारसा उपयोग नाही. तसेच विश्वचषक करंडक तर न्यूझीलंडला गमवावा लागला. आता हा नियम करून काय उपयोग असा अप्रत्यक्ष खोचक टोला जेम्स नीशमने ICC ला लगावला.