भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या वन-डे सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने शतकी खेळीची नोंद केली. वन-डे क्रिकेटच्या कारकिर्दीतलं विराटचं हे ४२ वं शतक ठरलं आहे. वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम हा भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनच्या नावावर वन-डे क्रिकेटमध्ये ४९ शतकं जमा आहेत. सचिनचा हा विक्रम मोडण्यासाठी विराटला आणखी ८ शतकांची गरज आहे.

क्रीडा पत्रकार बोरिया मुजुमदार यांच्या पुस्तक प्रकाशनाचा सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. या कार्यक्रमात सचिनला, विराटने तुझ्या शतकांचा विक्रम मोडला तर….? असा प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना सचिन म्हणाला, “ज्या दिवशी विराट कोहली माझा विक्रम मोडेल, त्यादिवशी मी स्वतः जाऊन त्याला शँपेनची बाटली देईन. आम्ही दोघं एकत्र बसून शँपेन पिऊ.” सचिनच्या या उत्तराला उपस्थित प्रेक्षकांनीही प्रतिसाद दिला.

विंडीजविरुद्धच्या दुसऱ्या वन-डे सामन्यात विराट कोहलीने १२५ चेंडूत १२० धावा केल्या. त्याच्या या खेळीत १४ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. तीन सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना पावसामुळे रद्द झाला असून दुसऱ्या सामन्यात भारताने बाजी मारली आहे. त्यामुळे अखेरच्या सामन्यात भारतीय संघ कशी कामगिरी करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.