भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर सध्या न्यूझीलंडचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू ख्रिस केर्न्सच्या प्रकृतीबाबत चिंतेत आहे. त्याने ख्रिस केर्न्सला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. केर्न्सच्या हृदयावरील शस्त्रक्रियेनंतर त्याला अर्धांगवायूचा झटका आला आहे. सिडनीच्या रुग्णालयात ही शस्त्रक्रिया झाली. याआधी तो अनेक दिवस आयसीयूमध्ये (लाइफ सपोर्टवर) होता. गेल्या आठवड्यातच त्याला आयसीयूमधून बाहेर आणण्यात आले. हृदयावरील शस्त्रक्रियेनंतर त्याला पायाला अर्धांगवायूचा झटका आला आहे आणि त्यानंतर त्याची प्रकृती गंभीर आहे ,अशी माहिती त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी दिली.

सचिन तेंडुलकरने ट्वीट करत म्हणाला, ”केर्न्सच्या स्थितीबद्दल मी चिंतेत आहे. मी आशा आणि प्रार्थना करतो. लवकर बरा हो मित्रा. संपूर्ण क्रिकेट जग तू बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहे.”

 

सर्वोत्तम अष्टपैलूंपैकी एक मानला जाणारा, केर्न्स आणि त्याचे कुटुंब एकत्र वेळ घालवण्यासाठी कॅनबेरा येथे परतले होते आणि त्यांची प्रकृती हळूहळू सुधारत होती. केर्न्स गेल्या काही काळापासून पत्नी आणि मुलांसोबत ऑस्ट्रेलियामध्ये राहत आहे. त्याने न्यूझीलंडसाठी १९८९ ते २००६ पर्यंत ६२ कसोटी आणि २१५ एकदिवसीय सामने खेळले. त्याने दोन टी-२० आंतरराष्ट्रीय सामनेही खेळले आहेत. ख्रिस केर्न्सचा जन्म १३ जून १९७० रोजी झाला. त्याने न्यूझीलंडसाठी १९८९मध्ये पहिला कसोटी सामना आणि १९९१मध्ये पहिला एकदिवसीय सामना खेळला. तो शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना फेब्रुवारी २००६मध्ये खेळला होता.

हेही वाचा – ‘‘बॅटिंग करताना मी राहुल द्रविडला फॉलो करतो”, बांगलादेशच्या ‘स्टार’ खेळाडूनं केला खुलासा

न्यूझीलंडचा सहावा सर्वात यशस्वी गोलंदाज

ख्रिस केर्न्स न्यूझीलंडसाठी सर्वाधिक विकेट घेणारा सहावा खेळाडू आहे. त्याच्या पुढे कसोटीत रिचर्ड हॅडली, डॅनियल व्हिटोरी, ख्रिस मार्टिन, ट्रेंट बोल्ट आणि टीम साऊदी आहेत. जेव्हा केर्न्सने कसोटीतून निवृत्ती घेतली, तेव्हा त्याने सर्वाधिक कसोटी षटकारांचा (८७ षटकार) विक्रम केला. आता हा विक्रम ब्रेंडन मॅक्क्युलमच्या नावावर आहे.

मॅच फिक्सिंगमध्ये आले होते नाव

निवृत्तीनंतर २०१३ मध्ये ख्रिस केर्न्सचे नाव मॅच फिक्सिंगमध्ये आले. यानंतर, केर्न्सची आर्थिक स्थिती इतकी खराब झाली, की त्याला बस शेल्टरमध्ये काम करावे लागले. केर्न्स कॉर्पोरेशनचा ट्रक चालवताना दिसला असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.