सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांची मैत्री संपूर्ण क्रिकेट जगाताला माहित आहे. सचिन-सेहवाग जोडीने भारतीय संघासाठी डावाची सुरुवात करत अनेकदा संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली आहे. यानंतर सेहवागची जोडी गौतम गंभीरसोबत जमली आणि सचिन मधल्या फळीत खेळू लागला. मात्र मैदानातील जोडी तुटली असली, तरीही सेहवाग आणि सचिनची मैत्री आजही कायम आहे. त्यामुळेच कायमच हटके ट्विट करणाऱ्या सेहवागला सचिनने अतिशय हटके स्टाईलमध्ये शुभेच्छा दिल्या आहेत.
सचिनने वीरेंद्र सेहवागला त्याच्या ३९ व्या वाढदिवसानिमित्त ट्विटरवरुन शुभेच्छा दिल्या आहेत. ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा वीरु ! तुझ्या नव्या वर्षाची सुरुवात अगदी छान होवो. मैदानावर मी जेव्हा तुला काही सांगितले, तेव्हा तू कायम त्याच्या उलट केलंस. त्यामुळेच आता मीदेखील तेच करतोय,’ असे ट्विट सचिनने केले आहे. सचिनने हा सर्व मजकूर उलटा लिहिला आहे. त्यामुळेच सचिनच्या शुभेच्छा अगदी हटके ठरल्या आहेत.
.ǝɯ ɯoɹɟ ǝuo s,ǝɹǝɥ os ˙
सचिन आणि सेहवागची जोडी आजही भारतासह जगभरातील क्रिकेटप्रेमींच्या लक्षात आहे. सचिनची शैलीदार फलंदाजी आणि सेहवागची आक्रमक खेळी, यामुळे या दोघांनी संघाला अनेकदा शानदार सुरुवात करुन दिली. एक फलंदाज डावा आणि दुसरा उजवा असल्यावर गोलंदाजाला गोलंदाजी करताना समस्येला सामोरे जावे लागते, असे म्हटले जाते. मात्र सचिन-सेहवाग हे दोघेही उजवे असताना त्यांनी गोलंदाजांची धुलाई केली. भारतीय संघ २००३ च्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. त्यामध्ये सचिन-सेहवागच्या सलामीच्या भागिदारीचा महत्त्वाचा वाटा होता.
एकदिवसीय सामना असो वा कसोटी सामना, सेहवागची तुफानी फलंदाजी कायमच क्रिकेट रसिकांसाठी पर्वणी ठरली आहे. सेहवाग खेळपट्टीवर उभा राहिला, की भारतीय संघ डोंगराएवढी धावसंख्या रचणार, असा विश्वास भारतीय क्रिकेट चाहत्यांना असायचा. कसोटी सामन्यांमध्ये दोन त्रिशतके झळकावण्याची कामगिरी सेहवागच्या नावावर आहे. असा पराक्रम सेहवाग व्यतिरिक्त केवळ तीन खेळाडूंनाच जमला आहे. सेहवागशिवाय ब्रायन लारा, ख्रिस गेल, सर डॉन ब्रॅडमन यांच्या नावावरही कसोटीत दोन त्रिशतके आहेत. सेहवागने एकदिवसीय सामन्यात द्विशतक झळकावण्याची कामगिरी केली आहे. सचिननंतर एकदिवसीय सामन्यात द्विशतक करणारा सेहवाग हा दुसरा खेळाडू ठरला होता.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 20, 2017 2:56 pm
Web Title: sachin tendulkar wishes virender sehwag on 39th birthday