मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली यांची तुलना करणे बरोबर ठरणार नाही कारण सचिनने सर्वात कठीण युगात अनेक विक्रम मोडण्याचा पराक्रम केला. विराटला सचिनचा वारसदार मानले जात असून विराटनेदेखील कमी कालावधीत बरेच विक्रम मोडीत काढले आहेत. पण तरीदेखील दोन युगातील दोन महान खेळाडूंची तुलना करणे अयोग्य आहे, असे मत पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने व्यक्त केले.

“सचिनने क्रिकेटच्या सर्वात कठीण युगात फलंदाजी करून स्वत:ला सिद्ध केले. जर तो आताच्या युगात क्रिकेट खेळत असता, तर त्याने सुमारे १ लाख ३० हजार धावांचा टप्पा ओलांडला असता. त्यामुळे दोन वेगळ्या युगात खेळणाऱ्या सचिन आणि विराटची तुलना करणे चांगले नाही”, असे अख्तर ‘हेलो’साठी दिलेल्या व्हिडीओ मुलाखतीत म्हणाला.

याआधी दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज माजी खेळाडू एबी डीव्हिलियर्स, पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रम आणि भारताचा माजी फलंदाज गौतम गंभीर यांनीही विराट-सचिन तुलनेवर आपले मत व्यक्त केले.

गंभीरने दिलं कारणासहित स्पष्टीकरण

“मी नक्कीच सचिनची निवड करेन. जुन्या नियमनुसार पूर्ण ५० षटके एकच चेंडू आणि सीमारेषेवर पाच फिल्डर अशी परिस्थिती असतानादेखील उत्तम कामगिरी करणाऱ्या सचिनलाच माझी पसंती असेल. कारण नव्या नियमांमुळे फलंदाजी करण्यात खूप सहजता आली आहे”, असे गंभीर म्हणाला.

काय म्हणाला होता डीव्हिलियर्स?

“सर्वच प्रकारच्या क्रिकेट प्रकारात सचिनने उत्तम कामगिरी केली आहे. कोणाचेही यात दुमत असूच शकत नाही. पण आव्हानाचा पाठलाग करताना जेव्हा दडपणाची स्थिती असते, त्यावेळी विराट सचिनपेक्षा सरस आहे असं मला वाटतं. विराट जर फलंदाजी करत असेल, तर कितीही धावसंख्या कमीच आहे”, असे डीव्हिलियर्स म्हणाला होता.

अक्रमने नोंदवलं होतं महत्वपूर्ण निरीक्षण

“सचिनला जर मी डिवचण्याचा प्रयत्न केला असता, तर त्याने स्लेजिंगकडे लक्ष न देता खेळावर अधिक लक्ष केंद्रित केलं असतं. पण विराटला मात्र मी डिवचलं, तर तो मात्र चिडचिड करेल. आणि जेव्हा फलंदाज रागात असतो, तेव्हा तो शक्य तितकी फटकेबाजी करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच वेळी फलंदाजाला बाद करण्याची सर्वात जास्त संधी असते”, असं निरीक्षण अक्रमने नोंदवलं होतं.