आटपाट नगर होतं. तिथं एक राजा राज्य करीत होता. त्याच्या दोन राण्या होत्या. एक आवडती आणि दुसरी नावडती. लहानपणी आपण ऐकलेल्या अनेक कहाण्यांची सुरुवात ही अशीच असायची. तेथे राजाच्या दोन्ही k03राण्या आवडत्या किंवा नावडत्या का नव्हत्या, असा प्रश्न विचारायचा नसतो. नाण्याला जशा दोन बाजू असतात, तशाच चांगलं-वाईट, गोड-तिखट, खरं-खोटं अशा प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. माणसाचा विकास जसजसा होत जातो, तसतसा तो आपल्याला अनुकूल आणि प्रेरक वाटणाऱ्या मंडळींचा एक समूह एखाद्या परिघाप्रमाणे स्वत:भोवती उभारतो. आवडती माणसं आणि नावडती माणसं अशा याद्या बनवतो. मग आवडणाऱ्या माणसांचं गुणगान होतं. नावडणाऱ्या माणसांना त्या व्यक्तीच्या परिघाबाहेरच स्थान मिळतं. सचिन तेंडुलकर आणि बोरिया मुझुमदार यांनी संयुक्तपणे लिहिलेल्या आणि चार दिवसांपूर्वी प्रकाशित झालेल्या ‘प्लेइंग इट माय वे’चं प्रथमदर्शनी मूल्यमापन हे अशाच प्रकारे करता येऊ शकतं.
सचिनच्या कार्यकर्तृत्वाला हातभार लावणारे त्याचे कुटुंबीय, भाऊ अजित यांच्यामुळे घडलेली कारकीर्द, अंजलीशी प्रेम आणि साथसोबत, त्याला कारकीर्दीच्या विविध टप्प्यांवर सोबत करणारे खेळाडू व मार्गदर्शन करणारे प्रशिक्षक, त्याची आर्थिक गणितं सांभाळणारी मंडळी स्वाभाविकपणे आवडत्या यादीत स्थान मिळवतात. परंतु प्रशिक्षकपदाच्या कारकिर्दीत भारतीय क्रिकेटमध्ये दुफळी माजवणारे ऑस्ट्रेलियाचे ग्रेग चॅपेल, त्यांचे बंधू इयान चॅपेल, ‘मंकीगेट’ प्रकरणात हरभजन सिंगला लक्ष्य करणारे अ‍ॅन्ड्रय़ू सायमंड्स आणि रिकी पाँटिंग, प्रशिक्षक म्हणून अपेक्षाभंग करणारे कपिल देव, चेंडू कुरतडल्याचा ठपका ठेवणारे इंग्लिश सामनाधिकारी माइक डेनिस, १९९७मध्ये कर्णधारपदावरून तडकाफडकी व अपमानजनक पद्धतीने हकालपट्टी करणारे तत्कालीन बीसीसीआयचे पदाधिकारी, आदी नावडत्या व्यक्तींची यादीसुद्धा भली मोठी आहे. सचिनच्या आत्मचरित्रात्मक कथासूत्रात ही मंडळी खलनायक ठरतात. कथा, नाटक आणि चित्रपट या कोणत्याही प्रकारात नायक आणि खलनायक असल्याशिवाय रंगत वाढत नाही. हेच समीकरण या पुस्तकाच्या लेखनामध्ये आवर्जून सांभाळल्याचं जाणवतं. त्यामुळेच सचिन आतापर्यंत या विषयाबाबत मूग गिळून गप्प का होता? या प्रकरणांबाबत किंवा व्यक्तींबाबत आसूड त्याने आताच का ओढले? या प्रश्नांना वाव आहे. गेली काही र्वष मोठय़ा क्रिकेटपटूचं आत्मचरित्र किंवा चरित्रात्मक पुस्तक हे वाद निर्माण करणारी प्रकरणं चर्चेत आणून मग प्रकाशित करायचं, हा शिरस्ता सचिननेसुद्धा पाळला.
मुलतानच्या ऐतिहासिक कसोटीप्रसंगी सचिन १९४ धावांवर असताना कर्णधार राहुल द्रविडने भारताचा डाव घोषित केला होता. काल-परवापर्यंत सचिनला द्रविडचा हा निर्णय जिव्हारी लागल्याचं ऐकिवात होतं; परंतु प्रकाशन कार्यक्रमात मात्र ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ असं धोरण सांभाळत मुलतान कसोटीतील आमचा पाकिस्तान भूमीवरील विजय अधिक लक्षात राहणारा आहे. तसेच संघाला विजय मिळवून देणाऱ्या आम्हा दोघांमधील भागीदाऱ्या संस्मरणीय आहेत, हे दोघांनी सांगून आपल्यातील मित्रत्वाची ग्वाही दिली.
२००५-०६ या काळात तत्कालीन प्रशिक्षक ग्रेग चॅपेल आणि कर्णधार गांगुली यांच्यातील वादाने भारतीय क्रिकेटमध्ये मोठं वादळ निर्माण केलं होतं. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी आणि चॅपेल यांनी संघात प्रदूषित केलेलं वातावरण यामुळे भारतीय क्रिकेट अस्थर्याच्या उंबरठय़ावर होतं. परंतु सचिननं तोंडातून एक शब्दही काढला नाही. गांगुलीला संघातून वगळल्यानंतर संसदेतसुद्धा या प्रकरणाचे पडसाद उमटले होते. पण ‘दादा’च्या मदतीला तो त्या वेळी धावून गेला नाही. जर सचिन योग्य वेळी बोलला असता तर चॅपेल यांच्यापुढे पूर्णविराम देण्यासाठी भारतीय क्रिकेटला इतका वेळ लागला नसता. याचप्रमाणे कपिल देव प्रशिक्षक असताना माझ्या त्यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या, परंतु त्यांनी माझी निराशा केली, असं सचिनने आपल्या पुस्तकात नमूद केलं. भारतीय क्रिकेटशी बंडखोरी करून आयसीएल (इंडियन क्रिकेट लीग)च्या जथ्यात सामील झालेल्या आणि काही वर्षांपूर्वी पुन्हा परतलेल्या कपिल यांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळ सुनील गावस्कर किंवा रवी शास्त्री यांच्याइतपत महत्त्व देत नाही. नेमकी हीच गोष्ट हेरून कपिल सचिनच्या नावडत्या यादीत गेला.
२००८च्या सिडनी कसोटीत हरभजन सिंगने वर्णभेदात्मक शेरेबाजी करीत माकड संबोधल्याचा आरोप सायमंड्सने केला होता. सामनाधिकारी माइक प्रॉक्टर यांनी संवेदनात्मक पद्धतीने हे प्रकरण हाताळून हरभजनवर तीन सामन्यांची बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केला; परंतु मग भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने खंबीर भूमिका घेत त्याचा निषेध केला आणि दौरा अध्र्यावर सोडण्याची धमकी दिली. मग हा बंदीचा निर्णय रद्द करीत अर्वाच्य भाषा वापरल्याबद्दल हरभजनच्या मानधनातील ५० टक्के रक्कम कापण्यात आली. या प्रकरणाच्या सुनावणीत सचिन तेंडुलकरची जबानी महत्त्वाची ठरली होती. भज्जी ‘तेरी माँ की’ असे रागाने म्हटल्याचं मी ऐकलं, असं सचिनने म्हटलं होतं. ऑस्ट्रेलियाच्या मैदानी रणनीतीवर भाष्य करायला सचिन या वेळी अजिबात विसरला नाही.
परंतु सचिनच्या या पुस्तकात अनेक प्रश्न अनुत्तरित राहतात. २०००मध्ये मॅच-फिक्सिंग व सट्टेबाजी प्रकरणांचा पर्दाफाश झाल्यामुळे भारतीय क्रिकेटची प्रतिमा काळवंडली होती. मोहम्मद अझरुद्दीन, अजय शर्मा, मनोज प्रभाकर आणि अजय जडेजा हे क्रिकेटपटू दोषी सापडले होते; परंतु सहकारी क्रिकेटपटूंच्या या गैरकृत्यांबाबत सचिनने त्या वेळी जसं मौन पाळलं, तसंच पुस्तकातही राखलं. २०१३मध्ये स्पॉट-फिक्सिंग आणि सट्टेबाजी प्रकरणाने आयपीएलचा काळा चेहरा समोर आणला. परंतु सचिनने आपलं तोंड बंद राखणंच पसंत केलं. गेल्या वर्षीपासून भारतीय क्रिकेट एका कठीण कालखंडातून जात आहे. फिक्सिंग आणि सट्टेबाजी डागांपासून क्रिकेटच्या शुद्धीकरणाचे प्रयत्न सुरू आहेत; परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छता अभियानासाठी झाडू घेऊन रस्त्यावर उतरण्याचा देखावा करणाऱ्या खासदार सचिनला प्रथम आपलं घर म्हणजे भारतीय क्रिकेट स्वच्छ करण्याची आवश्यकता मुळीच वाटली नाही.
पंच पुनर्आढावा प्रक्रिया (डीआरएस), समकालीन महान क्रिकेटपटू ब्रायन लारा, ग्लेन मॅकग्रा, अ‍ॅलन डोनाल्ड, शेन वॉर्न याबाबत सचिनने लिहिण्याचं प्रकर्षांने टाळलं आहे. तर सोबतच्या फलंदाजीच्या योगदानाबाबत ओघानंच लेखन झालं आहे. एकंदर ‘गुण गाईन आवडी..’ हेच सूत्र सचिनने आत्मचरित्र लेखन करताना जोपासल्याचं प्रकर्षांने समोर येतं.
महाभारत युद्ध समाप्तीनंतर श्रीकृष्णाने प्रथम अर्जुनाला रथातून उतरायला सांगितलं. अर्जुनाला नवल वाटलं, परंतु श्रीकृष्णाच्या सूचनांचं पालन करून तो रथातून उतरला. त्यानंतर श्रीकृष्ण उतरताच अर्जुनाचा रथ जळून खाक झाला. त्यावर श्रीकृष्णाने सांगितलं, ‘‘कौरव सैन्याने टाकलेल्या अस्त्रांचा परिणाम रथावर झालेला होता. अगोदर जर मी उतरलो असतो, तर हा रथ तुझ्यासकट जळून गेला असता.’’ सचिननेही नेमकं तेच केलं. भारतीय क्रिकेटवर अस्त्रांचे आघात होणार नाहीत, याची दक्षता घेत शस्त्र न उचलता सारथ्य केलं. निवृत्तीचं गणित आखून तीन र्वष आधीच मित्र बोरियासोबत आत्मचरित्राची योजना आखली. निवृत्तीनंतर आता आपल्याला काही नावडत्या आणि प्रतिहल्ला होणार नाही, अशा गोष्टींवर भाष्य करून आत्मचरित्र गाजवता येईल, हीच तर शक्कल लढवली सचिनने!