मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या शेवटच्या आणि ऐतिहासिक २०० व्या कसोटी सामन्याच्या निमित्ताने सट्टेबाजीच्या बाजाराचे वातावरण तापले आहे. घरच्या मैदानावर अखेरचा सामना खेळणाऱ्या सचिनच्या प्रत्येक धावेवर सट्टेबाजांनी ‘भाव’ देऊ केला असला तरी सर्वाधिक सट्टा सचिनचे द्विशतक, शतक, अर्धशतक किंवा २५ धावा आदींवर खेळला जात आहे. सचिन शून्यावर बाद होऊ नये अशीच चाहते असलेल्या पंटर्सची इच्छा असावी. त्यामुळेच त्यांनी सचिन शून्यावर बाद झाला तर भाव देऊ केलेला नाही.
तब्बल दहा हजार कोटींच्या घरात सट्टेबाजारात उलाढाल होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सचिनच्या शतकासाठी चार रुपये ७० पैसे असा भाव लावला आहे, तर सचिनला शतक करण्यात अपयश येणार, या बाजूने पाच रुपयांचा भाव देऊ करण्यात आला आहे.
दोन्ही डावांत सचिनने क्रिकेटशौकिनांना अपेक्षित असलेला दमदार असाच खेळ करावा, अशीही सट्टेबाजांचीही इच्छा दिसते. दोन्ही डावांत शतक, ५० पेक्षा अधिक धावा यावर सट्टेबाजांनी भाव देऊ केला आहे. परंतु सचिनने एका डावात जरी शतक केले तरी चालेल, अशीच सट्टेबाजांची इच्छा आहे. त्यामुळे कुठल्याही एका डावात सचिनने शतक केले तरी सट्टेबाजांनी भाव देऊ केला आहे. गुरुवारी सामना सुरू होण्याआधी सट्टय़ाचा आकडा वाढेल, असा विश्वासही व्यक्त केला जात आहे.
सचिनचा सट्टेबाजारातील भाव
शतक – ४.७० रुपये / पाच रुपये
५० धावा – ६० पैसे/ ६५ पैसे
२५ धावा – २० पैसे / २३ पैसे
शून्य धावा – भाव नाही
द्वीशतक – १२ रुपये / १८ रुपये