आपल्या २४ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत सचिन तेंडुलकरने अनेक विक्रम आपल्या नावावर केले. शिवाजी पार्कच्या मैदानावर खेळणारा एक सामान्य घरातला मराठी मुलगा पुढे जाऊन जगभरात आपला झेंडा रोवेल अशी कोणी कल्पनाही केली नव्हती. परंतू आपल्या मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर सचिनने ही किमया करुन दाखवली. १४ ऑगस्ट १९९० हा दिवस सचिन तेंडुलकरच्या कसोटी कारकिर्दीतला महत्वाचा दिवस मानला जातो. आजच्या दिवशी सचिनने इंग्लंडच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर आपलं कसोटी क्रिकेटमधलं पहिलं शतक झळकावलं होतं. पहिल्या शतकावेळी सचिनचं वय अवघं १७ वर्ष होतं. यानंतर सचिनने मागे वळून न पाहता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतकांचा टप्पा गाठला. सचिनच्या पहिल्या कसोटी शतकाला आज तीन दशकं लोटली आहेत.

११९ धावांची खेळी करणाऱ्या सचिनच्या शतकामुळे भारत सामना वाचवू शकला. त्या सामन्यात इंग्लंडचा तत्कालीन कर्णधार ग्रॅहम गूच आणि माईक अथर्टन यांनी शतकी खेळी करत इंग्लंडला ५१९ धावांचा डोंगर उभारुन देण्यात मदत केली. कपिल देवच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने इंग्लंडला सडेतोड प्रत्युत्तर देत पहिल्या डावात ४३२ धावांपर्यंत मजल मारली. पहिल्या डावात इंग्लंड ८७ धावांची आघाडी घेऊ शकला. सचिनने पहिल्या डावात ६८ धावा केल्या. आपला दुसरा डाव ३२०/४ वर घोषित करुन इंग्लंडने भारताला विजयासाठी ४०८ धावांचं आव्हान दिलं.

अवश्य वाचा – पहिले कसोटी शतक नेहमीच खास!

दुसऱ्या डावात भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. अवघ्या १२७ धावांत भारताचा निम्मा संघ माघारी परतला होता. याच वेळी सचिनने आपली जबाबदारी ओळखत मैदानावर तळ ठोकत फटकेबाजी केली. सचिनच्या शतकी खेळीत १७ चौकारांचा समावेश होता. सचिनने ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानावर दाखवलेल्या जिगरबाज खेळामुळे दिवसाअखेरीस भारताची अवस्था ३४३/६ अशी झाली होती. हा सामना अनिर्णित राहिला असला तरीही आंतरराष्ट्रीय क्रिकेटने १७ वर्षाचा एक मुलगा पुढे काय करु शकतो याची झलक पाहिली होती. पुढे जाऊन सचिनने आपल्या वन-डे कारकिर्दीत ४९ तर कसोटी कारकिर्दीत ५१ अशी मिळून १०० शतकं झळकावली.