क्रिकेटच्या मैदानात भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातलं द्वंद्व प्रत्येकाने अनुभवलं आहे. अनेकदा भारत-पाक संघाच्या आजी-माजी खेळाडूंमध्ये सोशल मीडियावर जुंपलेली पहायला मिळाली आहे. पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदी हा भारतविरोधी वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असतो. अनेकदा सोशल मीडियावर त्याला आपल्या या सवयीमुळे टीकेचा सामना करावा लागला आहे. काही दिवसांपूर्वी शाहिदने एका मुलाखतीत, पाकिस्तानी संघाने भारताला इतक्यांदा हरवलं आहे की सामना संपल्यानंतर आम्हालाच दया यायची आणि आम्ही त्यांची माफी मागायचो. यानंतर शाहिदने भारतीय संघाची आणखी एक खोडी काढताना, सचिन तेंडुलकर शोएब अख्तर आणि सईद अजमल या गोलंदाजांचा सामना करताना घाबरायचा असं म्हटलंय.

“हे बघा, सचिन स्वतःच्या तोंडाने तर सांगणार नाही की होय मी घाबरायचो. शोएब अख्तरने आपल्या कारकिर्दीत असे काही स्पेल टाकलेत की तिकडे सचिनच नाही अनेक दिग्गज फलंदाजांना भीती वाटली होती. ज्यावेळेला तुम्ही मिड-ऑफ किंवा कव्हर च्या जागेवर फिल्डींगसाठी उभे असता, तेव्हा समोरच्या फलंदाजांची देहबोली तुम्हाला समजून येते. समोरचा फलंदाज दबावाखाली आहे की नाही हे तुम्हील लगेच ओळखू शकता. मी असं म्हणणार नाही, की शोएबने सचिनला नेहमी घाबरवलं आहे पण काही स्पेलमध्ये शोएबचा सामना करताना सचिनचे पाय कापताना मी पाहिले आहेत. तो बॅकफूटवर गेलेला मी पाहिलं आहे.” शाहिद पाकिस्तानी पत्रकार जैनस अब्बासच्या यू-ट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता.

इतकच नाही तर सचिन सईद अजमलचा सामना करायलाही घाबरायचा…२०११ विश्वचषकादरम्यान पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात सईद अजमलच्या गोलंदाजीवर सचिनला पंचांनी बाद ठरवलं होतं. परंतू DRS मध्ये चेंडू स्टम्पला लागत नसल्याचं दिसल्यामुळे सचिनला जीवदान मिळालं. “विश्वचषकादरम्यान सचिन अजलमचा सामना करायलाही घाबरायचा. पण यात काही मोठी गोष्ट आहे असं मला वाटत नाही. खेळाडूंवर अनेकदा दबाव असतो, त्यामुळे काही गोष्टी त्यांच्यासाठी कठीण होऊन जातात.” याआधीही आफ्रिदीने भारतीय संघाविरोधात अशी वक्तव्य केली आहेत. त्यामुळे आफ्रिदीच्या वक्तव्यावर भारतीय खेळाडू काय प्रतिक्रीया देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.