भारतीय उपखंडात एखाद्या खेळाडूने प्रदीर्घ काळ खेळण्याचा निर्णय घेतला तर निवृत्तीनंतर तो खेळाडू चटकन विस्मरणात जातो. सचिन तब्बल २४ वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीनंतर निवृत्त होत आहे. त्याच्या निवृत्तीनंतर जबाबदारी पेलू शकणारे युवा खेळाडू तयार आहेत. त्यामुळे निवृत्तीनंतर तेंडुलकर विस्मरणात जाईल, असे मत पाकिस्तानचा माजी कर्णधार जावेद मियाँदादने व्यक्त केले आहे. ‘‘सचिन तेंडुलकर जगभरातल्या युवा खेळाडूंसाठी आदर्श आहे. २००व्या कसोटीनंतरही सचिनच जगभरातल्या खेळाडूंसाठी अनुकरणीय असेल. शेवटच्या आणि २००व्या ऐतिहासिक कसोटीच्या निमित्ताने सचिनचा होणारा गौरव योग्यच आहे. सर्व गौरवांचा, सन्मानाचा तो सच्चा हकदार आहे. भारतीय क्रिकेटला त्याने दिलेले योगदान अमूल्य आहे. सर्वोत्तम फलंदाजांच्या मांदियाळीत त्याचा समावेश होतो,’’ असे मियाँदाद म्हणाले.