खेळ म्हटला की पडणं, लागणं, दुखापत या गोष्टी काही नवीन नाहीत. अनेक मैदानी खेळात खेळाडूंना दुखापतींना सामोरं जावं लागतं. पण याच खेळाच्या मैदानात एखाद्या खेळाडूचा मृत्यू होणं अत्यंत दुर्दैवी बाब आहे. अशीच एक दुर्दैवी गोष्ट कबड्डीच्या मैदानावर घडली. एका स्थानिक स्तरावरील कबड्डी स्पर्धेत हा प्रकार घडला.

छत्तीसगड राज्यातील धमतरी जिल्ह्यात गोजी या गावात एका कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा दोन दिवसांची होती. स्पर्धेत बुधवारी (२० जाने) कोकडी आणि पटेवा या दोन संघांदरम्यान कबड्डीचा डाव रंगला होता. सामना अंतिम टप्प्यात असताना कोकडी संघाचा खेळाडू नरेंद्र साहू अखेरच्या चढाईसाठी गेला आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

नरेंद्रने चढाईसाठी डाव टाकला. बोनसच्या पट्टीला स्पर्श करून २ गुणांची कमाई त्याने केली. तेथून माघारी परतन असतानाच विरोधी पटेवा संघाच्या एका खेळाडूने त्याचा पाय पकडून गुण वाचवण्याचा प्रयत्न केला. त्याला अडवण्याच्या प्रयत्नात इतर खेळाडूंनीही त्याला साथ दिली. नरेंद्रला संघातील खेळाडूंनी घेरा घातला असताना गोंधळलेला नरेंद्र जोरात मैदानावर पडला. नेमके त्याच वेळी त्याचे डोके त्याच्या शरीराखाली आले आणि शरीरीच्या वजनाखाली दबल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

प्रतिस्पर्धी खेळाडू त्याला अडवण्यासाठी त्याच्या अंगावर पडले होते. पण नरेंद्रची हालचाल बंद झाल्याने त्यांनी नरेंद्रला सोडून दिले. सारे जण बाजूला गेल्यानंतरही नरेंद्र उठत नाही हे पाहिल्यावर मात्र सारेच घाबरले. सामन्यातील पंच आणि खेळाडूंनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला पण सारे प्रयत्न निष्फळ ठरले. त्याला त्वरित रुग्णालयातही दाखल करण्यात आले होते, पण त्याचा श्वासोच्छवास सुरू नसल्याने त्याला मृत घोषित करण्यात आले.