सॅडिलो मॅनेने इंग्लिश प्रीमिअर लीग फुटबॉल स्पध्रेतील सर्वात जलद हॅट्म्ट्रिक नोंदविताना साऊदम्पटन संघाला अ‍ॅस्टन व्हिलावर ६-१ असा दणदणीत विजय मिळवून दिला. मॅनेने दोन मिनिट ५६ सेकंदात तीन गोल नोंदवून ११९४मध्ये लिव्हरपूल स्ट्रायकर रॉबी फॉल्वर यांच्या नावावर असलेला ४ मिनिट ३३ सेकंदाच्या विक्रम मोडला. या विजयासह साऊदम्पटन संघाने एका स्थानाची झेप घेत सहावे स्थान पटकावले आहे.
सामन्याच्या तेराव्या मिनिटाला मॅनेने गोल करून यजमानांचे खाते उघडले. या धक्क्यातून अ‍ॅस्टन व्हिला सावरतो तोच मॅनेने १४ व १६व्या मिनिटाला गोल धडाका करून हॅट्ट्रिक साजरी केली. या हॅट्ट्रिकसह मॅनेने इपीएलमध्ये सर्वात जलद हॅट्ट्रिक साजरी करण्याचा विक्रम केला, परंतु त्याला इंग्लिश फुटबॉलमध्ये जेम्स हॅयटर यांच्या नावावर असलेला विक्रम मोडण्यात अपयश आले. हॅयटर यांनी बॉर्नेमाऊथ संघासाठी ८४व्या मिनिटाला बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरताच व्रेक्सहॅम संघाविरुद्ध २ मिनिट २० सेकंदात हॅट्ट्रिक साजरी केली होती. मॅनेच्या धडाक्यानंतर शेन लाँग याने (२६ मि. व ३८ मि. ) दोन गोल करून मध्यंतरापर्यंत साऊथॅम्पटनला ५-१ अशी मजबूत आघाडी मिळवून दिली. अ‍ॅस्टल व्हिलाकडून ख्रिस्टीयन बेंटेकने ४५व्या मिनिटाला गोल केला. मध्यंतरानंतर साऊदम्पटनकडून ग्राझीआनो पेले याने गोल करून ६-१ असा विजय निश्चित केला.