प्रतिष्ठेच्या मुंबई महापौर श्री स्पर्धेत तळवलकर जीमच्या सागर कातुर्डेने बाजी मारली. त्याने माजी मुंबई श्री अतुल आंब्रे, रितेश नाईक, श्रीनिवास खारवीचे कडवे आव्हान मोडून काढत महापौर श्री चा किताब पटकावला. अंधेरी पूर्वेला शेर-ए-पंजाब सोसायटीत ही शरीरसौष्ठव स्पर्धा रंगली होती. भव्य-दिव्यतेत कुठेही कमी नसलेल्या या स्पर्धेने अंधेरीकरांच्या डोळ्याचे पारणे फेडले. माजी महाराष्ट्र श्री असलेल्या सागरने सुनीत जाधवच्या अनुपस्थितीत थेट किताबाला गवसणी घातली.

तब्बल दीड वर्षानंतर सागरने पटकावलेले हे पहिले विजेतेपद आहे. किताबाच्या लढतीप्रमाणे उपविजेतेपदाची लढतही रंगली. ज्यात गोल्ड जिमच्या रितेश नाईकने अनपेक्षितपणे अतुल आंब्रेला धक्का देत बाजी मारली. मुंबई उपनगर बॉडीबिल्डींग आणि फिटनेस असोसिएशन  आणि बृहन्मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशनच्या सहकार्याने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

एकंदर सात गटात खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत प्रत्येक गटात किमान दहा-बारा खेळाडू होते. 55 किलो वजनी गटात नितीन शिगवणपेक्षा सरस प्रदर्शन करीत संदेश सकपाळने बाजी मारली. मात्र 60 किले वजनी गटात नितीन म्हात्रेपुढे कुणाचेही काही चालले नाही. त्याने अपेक्षेप्रमाणे अव्वल स्थान पटकावले. 65 किलो वजनी गटात गटविजेतेपदासाठी आदित्य झगडे आणि प्रतिक पांचाळची स्पर्धा झाली.

ज्यात प्रतिक सरस ठरला. माँसाहेबचा श्रीनिवास खारवी 70किलो वजनी गटात पहिला आला. 75 किलो गटात रितेश नाईकने आपले सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करीत यश मिळवले. या स्पर्धेचा पुरस्कार सोहळा महापौर विश्वनाथ महाडेश्वर,आमदार अनिल परब, आमदार रमेश लटके, नगरसेवक बाळा नर, सदानंद परब, शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष अजय खानविलकर, अमोल कीर्तीकर, सरचिटणीस राजेश सावंत,सुनील शेगडे आणि कार्याध्यक्ष प्रवीण पाटकर यांच्या उपस्थितीत पार पडला.

मुंबई महापौर श्री 2018 चा निकाल

मुंबई महापौर श्री – सागर कातुर्डे ( तळवलकर्स)

उपविजेता – रितेश नाईक ( गोल्ड जिम)