भारतीय कसोटी संघाचा कर्णधार वृद्धीमान साहा हा सध्या खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. 2014 साली महेंद्रसिंह धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारल्यानंतर, साहाकडे कसोटी क्रिकेटमध्ये यष्टीरक्षणाची जबाबदारी सोपवण्यात आली. सध्या दुखापतीमुळे संघाबाहेर असलेल्या साहाच्या जागी ऋषभ पंत-दिनेश कार्तिककडे यष्टीरक्षणाचं काम सोपवण्यात आलंय. मात्र भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या मते साहा हा भारताचा सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक आहे.

कोलकात्यात एका खासगी कार्यक्रमात बोलत असताना गांगुलीने साहाचं कौतुक केलं. “गेलं वर्षभर साहा दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. मात्र गेल्या 5-10 वर्षांमधे साहा हा भारताचा सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक आहे. मला आशा आहे की तो दुखापतीमधून लवकरच बरा होईल. दुखापती या तुमच्या हातात नसतात. यष्टीरक्षकाचं काम हे खडतर असतं. चेंडूमागे झेपावताना त्यांना दुखापत होऊ शकते, त्यामुळे जितक्या लवकर साहा दुखापतीमधून सावरेल, तेवढं त्याच्यासाठी चांगलं असेल.”

अवश्य वाचा – ICC Test Rankings : विराटचे अव्वल स्थान अबाधित, अश्विनची क्रमवारीत घसरण

साहाच्या अनुपस्थितीत ऋषभ पंतने इंग्लंड दौऱ्यात यष्टीरक्षण आणि फलंदाजीत चांगली कामगिरी केली. आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीही ऋषभ पंतची संघात निवड झालेली असून, पार्थिव पटेललाही संघात अतिरीक्त यष्टीरक्षक म्हणून जागा देण्यात आलेली आहे. साहाने आतापर्यंत 32 कसोटी सामने खेळले असून त्याच्या नावावर 1164 धावा जमा आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर भारतीय संघ तात्काळ कसोटी सामने खेळणार नसल्यामुळे वृद्धीमान साहाचं संघातलं पुनरागमन लांबण्याची चिन्ह आहेत.

अवश्य वाचा – माझ्या त्या ‘डेड बॉल’ला मान्यता द्या; शिव सिंगचं BCCIला साकडं