महिला रोईंगपटूने केलेल्या आत्महत्येचा सावट अजून दूर झाले नाही तोच भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साइ) तिरुवनंतपुरम  येथील केंद्रात एका १९ वर्षीय धावपटूने हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
लक्ष्मीबाई राष्ट्रीय शारीरिक शिक्षण संस्थेत शिकणाऱ्या नितीन यू या खेळाडूने बुधवारी सकाळी हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या मागचे कारण समजू शकले नाही. संस्थेचे प्राचार्य डॉ.जी.किशोर यांनी सांगितले, या मुलाने काचेच्या ग्लासचा तुकडा घेतला व त्याच्या साहाय्याने त्याने नस तोडण्यास सुरुवात केली. अन्य खेळाडूंच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्याला त्वरित येथील रुग्णालयात नेण्यात आले. त्याच्यावर त्वरित उपचार करण्यात आले व त्याला सोडण्यातही आले. त्याच्यावर दडपण आले असावे व नैराश्येपोटी त्याने हे कृत्य केले असावे. किशोर यांनी पुढे सांगितले, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश आम्ही दिले आहेत. त्यासाठी एका वरिष्ठ अधिकाऱ्यासह तीन सदस्यांनी लगेच चौकशी सुरू केली आहे.
नितीन चिनईन्कीजू गावचा रहिवासी असून, १०० तसेच २०० मीटर धावण्यात राज्य विजेता आहे. गेली चार वर्षे येथे प्रशिक्षण घेत आहे. आपण मानसिक दडपणाखाली हे कृत्य केले असल्याचे लेखी निवेदनही त्याने संस्थेकडे दिले आहे.  
काही दिवसांपूर्वी साइ संस्थेच्या आलाप्झुहा केंद्रात जलक्रीडा स्पर्धाचा सराव करणाऱ्या पंधरा वर्षीय मुलीने विषारी फळे खाऊन आत्महत्या केली होती. तिच्याबरोबर अन्य तीन खेळाडूंनीही तसा प्रयत्न केला होता मात्र या तीन खेळाडूंना वाचविण्यात वैद्यकीय तज्ञांना यश आले होते.
आत्महत्या सत्रामुळे साइ केंद्रांमधील वातावरण आणि सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.