उत्कंठापूर्ण लढतीत साई स्पोर्ट्स या पुण्याच्या संघाने ठाण्याच्या शिवशंकर संघावर ३३-३१ अशी मात करीत राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेतील पुरुष गटात विजेतेपद मिळविले. महिलांमध्ये मुंबईच्या शिवशक्ती संघाने मुंबईच्या महात्मा गांधी संघाला ‘गोल्डन रेड’च्या जोरावर ३१-३० असे पराभूत केले.
खराडी जिमखाना येथे आयोजित केलेल्या या स्पर्धेत दोन्ही विभागाचे अंतिम सामने अतिशय चुरशीने खेळले गेले. साई स्पोर्ट्स संघ पूर्वार्धात १२-१७ असा पिछाडीवर होता. उत्तरार्धात त्यांनी आक्रमक खेळ करीत सामन्यास कलाटणी दिली. साई स्पोर्ट्स संघाकडून मोमिन शेख व विठ्ठल कट्टीमणी यांनी महत्त्वाचा वाटा उचलला. पकडीत रेवण हिरेमठ याने त्यांना चांगली साथ दिली.
महिलांच्या अंतिम लढतीत पूर्ण वेळेनंतर २५-२५ अशी बरोबरी झाली होती. शेवटची पाच मिनिटे बाकी असताना महात्मा गांधी संघाने २२-२१ अशी आघाडी घेतली होती. तीन मिनिटे बाकी असताना शिवशक्ती संघाच्या अपेक्षा टकलेने चढाईत एका बोनस गुणासह दोन गुणांची कमाई करीत संघास २३-२२ अशी आघाडी मिळवून दिली. अपेक्षाने त्यानंतर आणखी एक गुण मिळविला. महात्मा गांधी संघाच्या पूजा केणीनेदेखील एक गुण मिळविला. शेवटची ४० सेकंद बाकी असताना गांधी संघाच्या मीनल जाधवने चढाईत एक गुण मिळवीत २५-२५ अशी बरोबरी साधली. अलाहिदा पाच-पाच चढायांमध्ये दोन्ही संघांनी प्रत्येकी पाच गुण मिळविल्यामुळे ३०-३० अशी बरोबरी झाली. गोल्डन रेडच्या वेळी शिवशक्ती संघाच्या अपेक्षा हिने गांधी संघाच्या तृप्ती सोनवणे हिला बाद करीत संघास ३१-३० असा विजय मिळवून दिला.
स्पर्धेतील सवरेत्कृष्ट खेळाडू म्हणून मोमिन शेख (पुरुष गट) व अपेक्षा टकले (महिला गट) यांची निवड करण्यात आली. पारितोषिक वितरण समारंभ राज्य कबड्डी संघटनेचे अध्यक्ष किशोर पाटील यांच्या हस्ते व खजिनदार शांताराम जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झाला.