भारतीय बॅडिमटनपटू बी. साईप्रणीत, अजय जयराम यांच्यासह ज्वाला गट्टा-अश्विनी पोनप्पा जोडीने कॅनडा खुल्या ग्रां. प्रि. बॅडमिंटन स्पध्रेची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.
२२ वर्षीय १०व्या मानांकित प्रणीतने श्रीलंकेच्या निलुका करुणारत्नेचा १४-२१, २१-१५, २१-१५ असा ५७ मिनिटांच्या लढतीत पराभव केला. गेल्या आठवडय़ात अमेरिकन खुल्या स्पध्रेची उपांत्य फेरी गाठल्यामुळे हैदराबादच्या प्रणीतने जागतिक क्रमवारीत ३३व्या स्थानावर मजल मारली आहे. तसेच नवव्या मानांकित जयरामने इंडोनेशियाच्या विष्णू युली प्रसेत्योचा २१-१२, १७-२१, २१-१२ असा पराभव केला. तथापि, पुरुष एकेरीत आनंद पवारचे तर महिला एकेरीत तन्वी लाडचे आव्हान संपुष्टात आले.
राष्ट्रकुल क्रीडा स्पध्रेत रौप्यपदक विजेत्या ज्वाला आणि अश्विनी जोडीने नेदरलँड्सच्या समांथा बॅरिंग आणि इरिस टॅबेलिंगचा १६-२१, २१-१६, २१-१७ असा पराभव केला. याशिवाय प्रज्ञा गद्रे आणि एन. सिक्की रेड्डी जोडीने जर्मनीच्या योहाना गोलिझवस्की आणि कार्ला नेल्टे जोडीला २१-१५, २१-१२ असे सहज नामोहरम केले.
पुरुष एकेरीतील उदयोन्मुख जोडी मनू अत्री आणि बी. सुमित रेड्डी यांनी पराभव पत्करला. चायनिज तैपेईच्या झे-हुई ली आणि यांग ली यांनी २१-१९, २१-१९ अशा फरकाने विजयासह आगेकूच केली.
तरुण कोना आणि एन. सिक्की रेड्डी या जोडीचेही मिश्र दुहेरीतील आव्हान संपुष्टात आले. अव्वल मानांकित मायकेल फुचस आणि बर्गीट मिचेल्स या जर्मनीच्या जोडीने त्यांना हरवले.