केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचा निर्णय

नवी दिल्ली : भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साइ) आगामी आधुनिक क्रीडा केंद्रांना देशाचे नाव उंचावणाऱ्या क्रीडापटूंची नावे दिली जाणार आहेत, असा निर्णय केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने रविवारी जाहीर केला. देशातील क्रीडापटूंच्या सन्मानार्थ हे पाऊल उचलण्यात आले आहे, असे ‘साइ’कडून सांगण्यात आले.

लखनौ येथे वातानुकूलित कुस्ती केंद्र आणि जलतरणाचे राष्ट्रीय सराव केंद्र तयार होते आहे. भोपाळला राष्ट्रीय केंद्रात १०० जणांची निवासव्यवस्था ठेवू शकणाऱ्या हॉस्टेलची निर्मिती होत आहे. याचप्रमाणे सोनीपत आणि गुवाहाटी येथेही आधुनिक दर्जाची क्रीडा केंद्रे ‘साइ’कडून तयार करण्यात येत आहेत.

‘‘देशात क्रीडा संस्कृती निर्माण होण्यासाठी क्रीडापटूंचा अपेक्षित सन्मान होणे गरजेचे आहे. त्यामुळे युवा पिढी क्रीडाक्षेत्रात कारकीर्द घडवण्यासाठी प्रेरणा घेऊ शकेल,’’ असे केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले. ‘‘सध्या खेळत असलेल्या आणि माजी क्रीडापटूंना आपले जीवन सन्मानाने जगता यावे, याकरिता आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी असू,’’ असे रिजिजू यांनी सांगितले.

देशातील अतिशय मोजक्या क्रीडा केंद्रांना क्रीडापटूंची नावे देण्यात आली आहेत. त्यामुळे हा विषय नेहमीच वादग्रस्त ठरत आला आहे.