सई सुकळेचा सहा जलतरण मार्गावर विक्रम

नवी मुंबई येथील (नेरूळ) सई समीर सुकळे हिने दक्षिण आफ्रिकेतील अटलांटिक महासागरातील सहा जलतरण मार्ग एका महिन्यात पोहून विक्रमाची नोंद केली आहे. यात तिला दोन सुवर्ण, दोन रौप्य व दोन कांस्यपदके मिळाली आहेत. महिनाभरात हे सहाही जलतरण मार्ग पोहून जाणारी मुलींमध्ये ती सर्वात कमी वयाची जलतरणपटू ठरली आहे. या विक्रमाबद्दल केपलॉग डिस्टन्स स्वीिमग असोसिएशनने तिचा गौरव केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही तिचे अभिनंदन केले.

सई सुकाळे ही नेरूळ येथे नववीत (वय १४) शिकते. कोपरगावचे ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक तथा माजी नगराध्यक्ष बाबुराव गवारे यांची ती पणती व साई मोटर्सचे संचालक शरद गवारे यांची नात आहे. सोमवारी कोपरगाव येथे तिने पत्रकारांना या विक्रमाची माहिती दिली.

दि. २८ मार्च ते २० एप्रिल या काळात सई हिने अटलांटिक महासागरातील प्रिकोस्टोल-पियरलीस, लांगेबान (८ किलोमीटर), रॉबेन आर्यलड ब्लोबर्ग (७.४ किलोमीटर), केप ऑप गुडहो पॉइंट (८ किलोमीटर), ललडुडनो कॅम्प्स बे (८ किलोमीटर), वेस्ट कोस्ट एंजल मिल्कबोझ (१८ किलोमीटर) आणि अराऊंड रॉबेन आर्यलड (११ किलोमीटर) हे सहा जलतरण मार्ग पार केले. या सागरी मोहिमेसाठी मुख्यमंत्री निधीतून सईला ७ लाख रुपयांची मदत झाली.

सईने वयाच्या पाचव्या वर्षांपासून जलतरणाला सुरुवात केली. याआधी तिने मालवणचा समुद्रकिनारा (२ किलोमीटर), कोलकाता येथे हुबळी नदी (१४ किलोमीटर), मोरा ते सांडवा-अलिबाग, धरमतर ते गेट वे ऑफ इंडिया पोहून पार केले. या अनुभवाच्या जोरावर तिने अटलांटिक महासागरातील सहा जलतरण मार्ग यशस्वीपणे पार केले. उरण येथील प्रशिक्षक किशोर पाटील, दक्षिण आफ्रिकेतील प्रशिक्षक डेरिक फ्रेझर यांचे तिला मार्गदर्शन लाभले. सईचे वडील समीर यांचा नव्या मुंबईत भाजी विक्रीचा व्यवसाय आहे, तर आई सुवर्णा या ज्यूदो कराटे निष्णात आहेत.