आशियाई क्रीडा स्पर्धेला अवघ्या एका महिन्याचा कालावधी असतानाच महिला वेटलिफ्टर मीराबाई चानूच्या दुखापतीने त्रस्त असण्याच्या बातमीने सर्व क्रीडारसिकांना धक्का बसला होता. मात्र, राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेत्या मीराबाईने स्वत: दोन आठवडय़ांमध्ये पूर्णपणे तंदुरुस्त होण्याची शक्यता बळावली आहे, अशी प्रतिक्रिया दिल्याने सगळ्यांनीच सुटकेचा श्वास सोडल आहे.

‘‘माझी पाठीची दुखापत ही गंभीर आहे, हे मला मान्य आहे. तसेच गेला दीड महिना मी सराव शिबिरातही उपस्थित राहिलेली नाही. मात्र, मंगळवारी माझ्या विविध चाचणींच्या आलेल्या अहवालानुसार किमान दोन आठवडय़ांमध्ये मी पूर्णपणे तंदुरुस्त होईन, अशी आशा वाटते,’’ असे मीराबाई म्हणाली.

ती पुढे म्हणाली, ‘‘मे महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात मला पाठीचा त्रास जाणवू लागला. त्यावर उपाय करण्यासाठी मी दिल्लीपासून मुंबईपर्यंत फिरले. मात्र, कोणत्याही वैद्यांना मला नेमकी कोणती दुखापत झाली आहे, हे सांगणे कठीण जात होते. माझ्या सर्व चाचण्यांचे व क्ष-किरणांच्या अहवालानुसार मी अगदी ठणठणीत आहे, हेच सिद्ध करत होते.’’

वैद्यांनी मीराबाईला कोणत्याही प्रकारचे वजन उचलण्यापासून मनाई केली आहे. सध्या ती पटियाला येथील राष्ट्रीय क्रीडा संस्थेत राहत असून शरारीच्या फक्त पोटावरील भागाचाच ती व्यायामही करत आहे.

‘‘आशियाई क्रीडा स्पर्धेत भाग घेण्यासाठी मी उत्सुक असून त्याआधी नक्कीच तंदुरुस्त होऊन जोमाने सरावाला लागेन. वेटलिफ्टिंगमध्ये भारताला थायलंड, चीन, कझाकस्तान यांसारख्या देशांचे आव्हान पेलायचे आहे. त्यामुळे, मी माझे सर्वस्व पणाला लावून खेळण्यासाठी आतुर आहे,’’ असे मीराबाईने सांगितले.

४८ किलो वजनी गटात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मीराबाई व्यतिरिक्त राखी हल्दर (६३ किलो), राष्ट्रकूल सुवर्णपदक विजेता सतीश शिवलिंगम व अजय सिंग (७७ किलो), विकास ठाकूर (९४ किलो) यांची आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी वेटलिफ्टिंग चमूत निवड करण्यात आली आहे.