भारताची अनुभवी बॅडमिंटनपटू सायना नेहवालची टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरण्याची संधी हुकणार का, अशी चिंता क्रीडाप्रेमींना सध्या भेडसावत आहे. देशातील वाढत्या करोना रुग्णसंख्येमुळे मलेशिया आणि सिंगापूरने घातलेल्या प्रवासाच्या निर्बंधांमुळे सायनासह अन्य भारतीय खेळाडूंना पात्रता स्पर्धांसाठी दोहामार्गे मलेशियाला रवाना व्हावे लागण्याची शक्यता आहे.

भारतीय बॅडमिंटन संघटनेने याविषयी माहिती दिली. २३ जुलैपासून टोक्यो ऑलिम्पिकला प्रारंभ होणार आहे. या प्रतिष्ठित स्पर्धेसाठी पात्र ठरण्याकरता सर्व बॅडमिंटनपटूंसाठी आता दोनच स्पर्धा उपलब्ध आहेत. २५ ते ३० मेदरम्यान मलेशिया खुली, तर १ ते ६ जूनदरम्यान सिंगापूर खुली बॅडमिंटन स्पर्धा रंगणार आहे. भारतात होणारी इंडिया खुली सुपर ५०० स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. त्याशिवाय मलेशिया आणि सिंगापूरने भारतातील नागरिकांना थेट प्रवेशास मनाई केल्याने सायना आणि किदम्बी श्रीकांत यांच्यावरील आव्हानांत वाढ झाली आहे.

‘‘सध्याचे प्रवासावरील निर्बंध पाहता भारतीय बॅडमिंटनपटूंना थेट मलेशिया गाठणे अशक्य आहे. त्यामुळे श्रीलंका अथवा दोहा येथून भारतीय बॅडमिंटनपटूंना मलेशियाला पाठवण्याचा आमचा विचार सुरू आहे,’’ असे बॅडमिंटन संघटनेने स्पष्ट केले. भारताकडून आतापर्यंत पी. व्ही. सिंधू, बी. साईप्रणीत, चिराग शेट्टी आणि सात्त्विकसाइराज रंकीरेड्डी यांनी ऑलिम्पिकमधील स्थान पक्के केले आहे.