पुढील आठवडय़ात सुरू होणाऱ्या जपान खुल्या सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत भारताच्या अव्वल महिला खेळाडू सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू आमनेसामने येण्याची शक्यता आहे.
नुकत्याच पार पडलेल्या जागतिक अजिंक्यपद स्पध्रेतील रौप्यपदक विजेत्या सायनाला पहिल्या फेरीत जागतिक क्रमवारीत १७ व्या स्थानावर असलेल्या थायलंडच्या बुसानान आँगबुम्रूंगपान हिच्याशी, तर दोन वेळा जागतिक स्पध्रेत कांस्यपदक जिंकणाऱ्या सिंधूला बिगरमानांकित जपानच्या मिनत्सू मितानी हिच्याशी सामना करावा लागेल. ८ ते १३ सप्टेंबर या कालावधीत ही स्पर्धा टोकियोत पार पडणार आहे. दुसऱ्या फेरीत सायना-सिंधू समोरासमोर आल्यास या दोघांमधील ही दुसरी लढत असेल. याआधी २०१४ च्या भारत ग्रां. प्रि. सुवर्णचषक स्पध्रेच्या अंतिम फेरीत या दोघींमध्ये लढत झाली होती आणि त्यात सायनाने बाजी मारली होती. तसेच २०१३ च्या इंडियन बॅडमिंटन लीगमध्ये सायना-सिंधू एकमेकींविरुद्ध खेळल्या
होत्या.
या दोन महिला खेळाडूंव्यतिरिक्त जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेल्या किदम्बी श्रीकांतला पुरुष गटात मानांकन मिळाले आहे. पहिल्याच सामन्यात त्याला आर्यलडच्या स्कॉट इव्हान्सचा सामना करावा लागेल. पारुपल्ली कश्यपसमोर स्थानिक खेळाडू तकुमा उएडाचे, अजय जयरामसमोर विक्टर अस्केलसेनचे आणि एच. एस. प्रणॉयसमोर वाँग विंग की विन्सेंटचे आव्हान असणार आहे.
महिला दुहेरीत कॅनडा खुल्या बॅडमिंटन स्पध्रेचे जेतेपद पटकावणाऱ्या ज्वाला गट्टा आणि अश्विनी पोनप्पा यांना आठव्या मानांकित झाओ युन्लेई आणि झोंग क्विंसीन या चिनी जोडीचा सामना करावा लागेल. प्रज्ञा गद्रे व एन. सिक्की रेड्डी हे जपानच्या अव्वल मानांकित मिसाकी मात्सुटोमो आणि अयाका तकाहाशी यांच्याविरुद्ध खेळतील.