ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत भारताची अव्वल बॅडमिंटनपटू साईना नेहवाल हिचे उपांत्यपूर्व फेरीतच आव्हान संपुष्टात आले आहे. सातव्या मानांकित साईनाचा चीनच्या शिझियन वँगने 21-17, 21-10 असा सरळ दोन गेममध्ये पराभव केला. चौथ्या मानांकित शिझियन वँगचा उपांत्य फेरीत दुसऱ्या मानांकित यिहान वँग हिच्याशी सामना होणार आहे. साईनाला यापूर्वी उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात अमेरिकेच्या झॅंग बेईवेन हिचा कडवा प्रतिकार सहन करावा लागला होता. भारताच्या पी. व्ही. सिंधू हिलाही चीनच्या सन यू हिच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. तिला सनने 21-16, 21-15 असे 47 मिनिटांत पराभूत केले.