भारताची फुलराणी सायना नेहवालमध्ये अजूनही पदक विजेती कामगिरी करण्याची क्षमता आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये ती पदक जिंकू शकते असा विश्वास भारताचे बॅडमिंटन प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी व्यक्त केला आहे. सायना सुद्धा गोपीचंद यांची शिष्य आहे. मध्यंतरी दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले होते.

सायना नेहवाल सध्या जागतिक क्रमवारीत २२ व्या स्थानावर आहे. टोक्योला जाणाऱ्या भारताच्या ऑलिम्पिक पथकात स्थान मिळवण्यासाठी सायनाला क्रमवारीत सुधारणा करुन, टॉप १६ मध्ये प्रवेश करावा लागेल. “सायनाच्या फिटनेसमध्ये समाधानकारक सुधारणा झालेली नाही. सध्याच्या तिच्या स्थितीमध्ये अजून १० टक्के जरी सुधारणा झाली तरी, निश्चित आपण तिच्याकडून पदाकची आशा बाळगू शकतो. सायनामध्ये जगातील सर्वोत्तम खेळाडूंना हरवण्याची क्षमता आहे. मोठया स्तरावर खेळताना चांगले आरोग्य आणि फिटनेस असेल तर, निश्चित पदकाची आशा बाळगू शकतो” असे गोपीचंद म्हणाले.

मागच्या काही वर्षांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या बॅडमिंटनपटूनी सर्वोत्तम कामगिरी केली आहे. २०१२ ला लंडन ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनमध्ये कास्य, त्यानंतर २०१६ साली रियोमध्ये रौप्यपदक मिळवले.