जागतिक क्रमवारीत दुसरे स्थान पटकावणाऱ्या सायनाने स्विस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत आगेकूच केली. तिने बल्जेरियाच्या पेटय़ा नेडेलचेव्हाला अवघ्या अर्धा तासात २१-१५, २१-१० असे सहज नमवले.
गतविजेत्या आणि अव्वल मानांकित सायनाने या विजयासह नेडेलचेव्हाविरुद्धच्या सामन्यात ६-२ अशी भक्कम आघाडी घेतली आहे. सायनाची पुढची लढत त्झु यिंग ताईशी होणार आहे.
महिलांमध्ये पी.व्ही.सिंधू, पुरुषांमध्ये पारुपल्ली कश्यप, एच.एस. प्रणॉय तर पुरुष दुहेरीत प्रणव चोप्रा-अक्षय देवलकर यांना उपउपांत्यपूर्व फेरीतच पराभवाला सामोरे जावे लागल्याने भारतातर्फे सायनाचे एकटीचेच आव्हान शिल्लक आहे.
यंदाच्या वर्षांत तीन स्पर्धा खेळलेल्या सायनाला एकाही जेतेपदावर नाव कोरता आलेले नाही. ऑल इंग्लंड स्पर्धेत चीनच्या खेळाडूंच्या अनुपस्थितीत सायना जेतेपदासाठी प्रबळ दावेदार होती. मात्र उपांत्य फेरीतच तिचे आव्हान संपुष्टात आले. या स्पर्धेद्वारे वर्षभरातील पहिलेच जेतेपद कमावण्यासाठी सायना उत्सुक आहे.