कश्यप, सिंधूचे आव्हान संपुष्टात
कोरिया सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धा
नवीन वर्षांत दमदार सलामी करणाऱ्या सायना नेहवालने गुरुवारी सरळ गेम्समध्ये शानदार विजय मिळवत कोरिया सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत आगेकूच केली. मात्र पारुपल्ली कश्यप आणि पी.व्ही. सिंधू यांना पराभवाला सामोरे जावे लागल्याने त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
सायनाने अवघ्या ३६ मिनिटांत इंडोनेशियाच्या मिंगटिअन फूचा २१-१६, २१-९ असा धुव्वा उडवला. सायनाने नेटजवळून सुरेख खेळ करताना स्मॅशच्या फटक्यांचाही प्रभावीपणे वापर केला. पहिल्या गेममध्ये सायनाने ३-१ आघाडी घेतली. ही आघाडी सातत्याने वाढवत तिने पहिल्या गेमवर कब्जा केला. दुसऱ्या गेममध्येही सायनाचे वर्चस्व राहिले. सुरुवातीलाच तिने ६-२ आघाडी घेतली. या आघाडीत सलग गुणांसह भर टाकत दुसऱ्या गेमसह सामना जिंकला. पुढच्या फेरीत सायनाचा मुकाबला चीनच्या लिन हानशी होणार आहे. हानविरुद्धच्या दोन लढतीत सायनाने विजय मिळवला आहे.
अन्य लढतींमध्ये थायलंडच्या पॉर्नटिप बुरानप्रासट्सुकने पी.व्ही.सिंधूचा २१-१९, २१-१३ असा पराभव केला. पॉर्नटिपविरुद्धच्या याआधीच्या दोन लढतीत सिंधूने विजय मिळवला होता मात्र गुरुवारी झालेल्या लढतीत सिंधूला चुकांचा फटका बसला.
पुरुषांमध्ये सातव्या मानांकित हाँगकाँगच्या युन ह्य़ुने कश्यपवर १६-२१, २१-१३, २१-१७ अशी मात केली. पहिला गेम जिंकत कश्यपने चांगली सुरुवात केली. दुसऱ्या गेममध्ये ह्य़ुने ३-० अशी आघाडी घेतली आणि त्यानंतर कश्यपला आगेकूच करण्याची कोणतीही संधी न देता गेम जिंकला.
तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये जबरदस्त मुकाबला पाहायला मिळाला. कश्यपने १६-१४ अशी आघाडी घेतली होती मात्र यानंतर कश्यपच्या रॅकेटमधील काही धागे निखळले आणि याचा त्याच्या खेळावर परिणाम झाला. ह्य़ुनने याचा फायदा घेत गेमसह सामना जिंकला.