सय्यद मोदी ग्रां.प्रि स्पर्धेतील विजेतेपदानंतर सायना नेहवाल व पारुपल्ली कश्यप हे भारतीय बॅडमिंटनपटू ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत स्वप्नवत जेतेपदासाठी उत्सुक आहेत.
या स्पर्धेच्या पात्रता सामन्यांना मंगळवारपासून प्रारंभ होत आहे. सायनाने २०१० व २०१३ मध्ये ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पध्रेच्या उपांत्य फेरीत धडक मारली होती, परंतु त्यापलीकडे तिला झेप घेता आलेली नाही़  ती म्हणाली, विजेतेपद मिळविण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. येथे अजिंक्यपद मिळविणे माझे स्वप्न आहे. ते यंदा साकार होईल, अशी मला आशा आहे. गेले महिनाभर बंगळुरू येथे या स्पर्धेसाठी जय्यत तयारी केली आहे. शारीरिक तंदुरुस्तीबाबत कोणत्याही समस्या नाहीत.
या स्पध्रेत सायनाला पहिल्या दोन फे ऱ्यांमध्ये पात्रता फेरीतून मुख्य फेरीत स्थान मिळविणाऱ्या खेळाडूंबरोबर खेळावे लागणार आहे. त्यानंतर तिला चीनच्या यिहान वाँग हिच्या आव्हानास सामोरे जावे लागेल. यिहान हिने आतापर्यंत नऊ लढतींपैकी आठ लढतींमध्ये सायनावर मात केली आहे.
कश्यपला पहिल्याच फेरीत सहाव्या मानांकित चोऊ तियान चेन याच्याशी खेळावे लागणार आहे.  कदम्बी श्रीकांत याला पहिल्या फेरीत त्याच्यापुढे जपानच्या केन्तो मोमोताचे आव्हान असेल़  पी़ व्ही़ सिंधू, एच.एस. प्रणॉय याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.